सुशांत सिंह राजपूतच्या रुममेटला तिसऱ्यांदा बोलावलं पोलीस स्टेशनला!

बी टाऊन
रोहित गोळे
Updated Jun 24, 2020 | 08:36 IST

Sushant Singh Rajput Friend Called Third Time Police Station:सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस तपासात कसलीही कसर सोडत नाहीत. त्यांनी सुशांतच्या मित्राला तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावलं आहे.

sushant singh rajput
सुशांत सिंह राजपूत  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला केली होती आत्महत्या 
  • मुंबई पोलीस करतायेत सतत चौकशी 
  • सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिटानीला चौकशीसाठी तिसऱ्यांदा बोलावलं 

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी आत्महत्या केली होती. तेव्हापासून त्याच्या चाहत्यांपासून ते संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीपर्यंत अनेकांना त्याच्या मृत्यूचा बातमीने अस्वस्थ करुन सोडलं आहे. अनेक चाहते सातत्याने सोशल मीडियावर अभिनेता सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली वाहत आहेत. दुसरीकडे, याप्रकरणी मुंबई पोलिस अत्यंत सखोल तपास करत असल्याचं दिसतं आहे.

सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीनंतर त्याचा मित्र आणि रूममेट सिद्धार्थ पिटानी याला चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं होतं. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार सिद्धार्थ याला यावेळी जबाब नोंदविण्यासाठी बोलावलं होतं. पोलिसांनी आतापर्यंत तीन वेळा सिद्धार्थल पोलिस ठाण्यात बोलावलं आहे. 

सुशांत सिंह राजपूत आणि त्याचा मित्र सिद्धार्थ पिटानी हे गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील वांद्रे येथे एकाच अपार्टमेंटमध्ये एकत्र राहत होते. काल जेव्हा सिद्धार्थला तिसऱ्यांदा चौकशीसाठी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये बोलविण्यात आले तेव्हा काही मीडिया फोटोग्राफर्सनी त्याला स्पॉट केले. वृत्तानुसार सिद्धार्थने याप्रकरणी आपला जबाब नोंदवला आहे. मात्र, चौकशीचा संपूर्ण तपशील समोर आलेला नाही.

सिद्धार्थमुळे झालं होतं रिया-सुशांतचं भांडण? 

सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची पोलिसांनी तब्बल १० तास चौकशी केली होती. रियाने पोलिसांसमोर कबूल केलं होतं की, ती सुशांतसोबत रिलेशनशीपमध्ये होती. रिया सुशांतबरोबर कार्टर रोड पेंटहाउसमध्ये राहत होती. जो सुशांतने आपला मित्र सिद्धार्थ पिटानीसोबत भाड्याने घेतला होता. दरम्यान, रियाचं सुशांतबरोबर त्याचा मित्र सिद्धार्थवरुन भांडण देखील झालं होतं. ज्यानंतर ती तिच्या घरी निघून गेली होती. दरम्यान, याच्याच एक आठवड्यानंतर सुशांतने आत्महत्या केली होती. दुसरीकडे सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी त्याचे चाहते काही बॉलिवूड दिग्गजांवर दोषारोप करीत आहेत.

सुशांतने जगाशी संबंध तोडला होता

सुशांत सिंह राजपूतने याने काही महिन्यांपूर्वीच संपूर्ण जगाशी संबंध तोडला होता. तो अनेक दिवस आपल्या घरातच होता. अखेर १४ जूनला आपल्या राहत्या घरात गळफास घेत सुशांतने आपलं जीवन संपवलं. सध्या अशीच माहिती समोर येत आहे की, सुशांत नैराश्याच्या गर्तेत अडकला होता ज्यामुळे त्याने अखेर आपलं आयुष्य संपवलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी