आशा भोसले यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार

singer asha bhosle selected for maharashtra bhushan award 2020 ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना २०२०चा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला.

singer asha bhosle selected for maharashtra bhushan award 2020
आशा भोसले यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार 

थोडं पण कामाचं

  • आशा भोसले यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाला निर्णय
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिनंदन

मुंबईः ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना २०२०चा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आशा भोसले यांचे अभिनंदन केले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आशा भोसले यांचे अभिनंदन केले. (singer asha bhosle selected for maharashtra bhushan award 2020)

आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला. बालपणापासूनच त्यांना मास्टर दीनानाथांच्या गाण्याचा वारसा लाभला. मंगेशकर कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्यावर सतत गाण्याचे उत्तम संस्कार झाले. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांचे मार्गदर्शन लाभले. यातून आशा भोसले यांची जडणघडण झाली, गळा तयार झाला. सुरांनी जगातील कोट्यवधी नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांनी बंगाली, हिंदी, तामीळ आणि मराठी भाषेत सिनेमा, लोकसंगीत, भक्तीगीते, अभंग, आरती अशा वेगवेगळ्या प्रकारांत गाणी गायली आहेत. पार्श्वगायिका म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

मराठीत मानिनी, मोलकरीण, जैत रे जैत, देवबाप्पा, सांगत्ये ऐका, सिंहासन, सामना, मराठा तितुका मेळवावा, निवडुंग अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. आशा भोसले यांना पद्मविभूषण, ग्रॅमी अॅवॉर्ड, राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे १५ वेगवेगळे पुरस्कार तसेच दादासाहेब फाळके सन्मान पुरस्कार, भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ पुरस्कार, बीबीसी रेडियोचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार आधी मिळाले आहेत.

सचिन देव बर्मन, ओ. पी. नय्यर, राहुल देव बर्मन, सुधीर फडके, हेमंत कुमार, हृदयनाथ मंगेशकर अशा अनेक दिग्गज संगीतकारांसोबत काम करण्याची संधी आशा भोसले यांना मिळाली. लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा अनेक गायकांसोबत त्यांनी काम केले. बा. भ. बोरकर, आरती प्रभू, ग. दि. माडगुळकर, शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोघे यांच्या कवितांबरोबर सौमित्रसारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांपुढे आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. तरुण आहे रात्र अजुनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती - अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे.

एस.डी.बर्मन यांच्यापासून ते ए.आर. रहमानपर्यंतच्या वेगवेगळ्या कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर आशा भोसले यांनी काम केले. मराठीत दत्ता डावजेकर-श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे. मधुबाला-मीनाकुमारीपासून ते अलीकडच्या तब्बू-उर्मिला मातोंडकर-ऐश्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी मोहम्मद रफी, किशोर कुमार व सुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ तर गाजवला आहेच, तसेच त्या आज हृषीकेश रानडे सारख्या तरुण गायकाबरोबरही गात आहेत. आशाताई आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी १४ भाषांमध्ये १२०००हून अधिक गाणी गायली आहेत. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली, अभिनेता संजय दत्त यांच्याबरोबर गाण्याचा प्रयोग केला. आशा अँड फ्रेंड्स हा आल्बम प्रचंड लोकप्रिय झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी