Sohail Khan and Seema Khan file Divorce : लग्नाच्या जवळपास २४ वर्षानंतर, सोहेल खान आणि सीमा खान यांनी शुक्रवारी (१३ मे) घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. फॅमिली कोर्टाबाहेर असलेल्या पापाराझींच्या कॅमेरात हे दोघंही कैद झाले. मात्र, त्यांनी अद्याप त्यांच्या घटस्फोटाबाबत अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. रिपोर्ट्सनुसार, ते गेल्या काही दिवसांपासून वेगळे राहत आहेत.
या जोडप्याने 1998 मध्ये लग्न केले आणि 2000 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे, मुलगा निरवान खानचे स्वागत केले. जून 2011 मध्ये, त्यांनी सरोगसीद्वारे त्यांचा दुसरा मुलगा योहानचे स्वागत केले.
फॅमिली कोर्टाच्या आवारातून, सोहेल आणि सीमा बाहेर पडत होते. न्यायालयाच्या जवळच्या एका सूत्राने ETimes ला सांगितले की, “सोहेल खान आणि सीमा सचदेव आज न्यायालयात हजर होते. त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोघेही एकमेकांशी मैत्रीपूर्ण वागत होते."त्यानंतर सोहेल त्याच्या कारच्या दिशेने जाताना दिसला, तर सोहेलला कडक सुरक्षा व्यवस्थेने वेढले होते.
एके काळी सोहेल खान आणि सीमा खान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो दिल्लीत राहणाऱ्या सीमाला भेटला. त्या वेळी, ती मुंबईत राहात होती आणि फॅशन डिझायनिंगमध्ये तिचे करिअर करत होती. लवकरच, त्यांनी डेटिंग सुरू केली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, सीमाच्या कुटुंबीयांनी हे नाते मान्य केले नाही. त्यानंतर त्यांनी घरातून पळ काढला आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत आपापल्या धर्मानुसार गुपचूप लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षानंतर, ते त्यांचा मुलगा निर्वाणचे पालक झाले आणि नंतर 2011 मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचे योहानचे स्वागत झाले. सीमाच्या कुटुंबाने नंतर हे नाते स्वीकारले.
'द फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज' या शोमध्ये सीमा आणि सोहेल वेगळे राहात असल्याचे दिसले होते, आणि त्यांची मुले दोन्ही घरांमध्ये फिरत होती. त्यानंतर या शोने दोघे एकत्र नसल्याचे म्हटले होते. याच शोमध्ये सीमा म्हणाली होती की, 'असे होते की, तुम्ही मोठे झाल्यावर तुमचे नाते वेगवेगळ्या दिशेने जाते. मी याबद्दल माफी मागणार नाही कारण आम्ही आनंदी आहोत आणि माझी मुले आनंदी आहेत. सोहेल आणि मी पारंपारिक लग्नात नाही पण आम्ही एक कुटुंब आणि एक युनिट आहोत. शेवटी, आमची मुले आमच्यासाठी महत्त्वाची आहेत. त्यांच्या विभक्त होण्याचे कारण अद्याप समजलेले नाही.