मुंबई : मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे सोनाली कुलकर्णी. आरस्पानी सौंदर्य, गजब फॅशन सेन्स आणि तुफान नृत्य याच्या बलावर सोनालीने मराठीसह अमराठी प्रेक्षकांमध्येही आपला मोठाच चाहतावर्ग निर्माण केला आहे. 'तमाशा लाईव्ह'या तिच्या काही काळातच रिलीज होणाऱ्या चित्रपटातले अजून एक नवे गाणे 'गरमा गरम' तुम्हाला नक्कीच ठेका धरायला लावेल. नव्या गाण्यावर तिने दिलेला भन्नाट परफॉर्मन्स असंख्य चाहत्यांना वेड लावतो आहे. (Sonalee Kulkarni's new song,)
सोनाली सध्या तिच्या बहुचर्चित 'तमाशा लाइव्ह' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतलेली आहे. येत्या 15 जुलैला प्रदर्शित होत असलेल्या या तिच्या सिनेमाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. या सिनेमातली गाणी एकामागे एक समोर येत असून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. आता समोर आलेले 'गरमागरम' हे गाणेही एकदम भन्नाट आहे.
'गरमागरम घ्या हे कव्हरेज, गरमागरम घ्या...' असे या गाण्याचे बोल आहेत. सोनाली निळ्या रंगाच्या अतिशय आकर्षक पेहरावात आपल्या पदन्यासाची जादू या गाण्यात दाखवते आहे.
लोकप्रिय गायिका वैशाली सामंत यांनी गायलेले हे गाणे क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले आहे. 'तमाशा लाइव्ह' चित्रपटाची एक खास गोष्ट म्हणजे यात स्वत: सोनालीने 'कडकलक्ष्मी' हे गाणे गायले आहे. काही काळापूर्वीच सिनेमातले 'मला तुझा रंग लागला...' हे गाणे आले आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेला 'तमाशा लाइव्ह' हा सिनेमा 15 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या ट्रेलरलाही रसिकांनी उचलून धरले आहे. या ट्रेलरला 3 मिलियनपेक्षाही जास्त व्ह्युज मिळाले आहेत. 'तमाशा लाइव्ह'मध्ये सोनालीसह पुष्कर जोग, सिद्धार्थ जाधव, मृणाल देशपांडे, सचित पाटील, नागेश भोसले, भरत जाधव, हेमांगी कवी, मनमीत पेम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे.