मुंबई: बाल कलाकार सनी पवारचं नाव जगात गाजलं ते 2016 साली लायन सिनेमामुळे. ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक गार्थ डेवीस यांच्या या सिनेमात हॉलिवूड स्टार देव पटेलच्या लहानपणीची भूमिका सनीनं साकारली आणि कलिनाच्या स्लममध्ये राहणारा हा मुलगा ऑस्करमध्ये पोहोचला. आता पुन्हा या 11 वर्षीय सनीनं आपलं नाव परदेशात गाजवलं आहे. त्याच्या चिप्पा सिनेमातल्या भूमिकेसाठी 19व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सनीला सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सनीच्या या नवीन कामगिरीमुळे पुन्हा एकदा त्याचं नाव परदेशात चर्चेत आलं असून सनी या सगळ्यामुळे फारचं भारावून गेला आहे.
त्याच्या या विजयावर व्यक्त होताना सनी म्हणाला, “मी खूपच खुश आहे, हे सगळं माझ्या पालकांमुळेच शक्य झालं. मला खूप मोठा अभिनेता बनायचंय, अगदी रजनीकांत यांच्यासारखा आणि माझ्या आई वडिलांना माझा अभिमान वाटेल असं काम मला करायचंय. मला बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्हीकडे काम करायचं आहे.” या वेळी सनी इतकाच आनंद त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावर ही पाहायला मिळाला. सध्या सगळीकडे सनीवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. असंच काहीसं चित्र 2016ला बघायला मिळालं होतं. 6 ऑस्कर नॉमिनेशन मिळालेल्या लायनसाठी सनी ऑस्कर सोहळ्याला हजर होता आणि तेव्हा त्याची दखल देखील घेतली गेली, होस्ट जिम्मी किमेलने सनीला ऑस्कर सोहळ्या दरम्यान उचलून देखील घेतलं. त्यामुळे पुन्हा एकदा परदेशात सनीनं आपल्या नाव राखलं आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांची नजर सनीकडे वळली आहे ती चिप्पा सिनेमामुळे.
चिप्पा सिनेमाची कथा सनीच्या कॅरेक्टर चिप्पा भवती रेखाटली असून ही कोलकत्यात राहणाऱ्या एका 10 वर्षाच्या मुलाची हृदयस्पर्शी गोष्ट आहे. अनेक वर्ष आपल्या वडिलांपासून लांब राहिल्यावर अखेर 10व्या वर्षी या लहानग्या मुलाला आपल्या बाबांचं एक पत्र मिळतं आणि इथे या मुलाचा रंजक प्रवास सुरू होतो. एका रात्रीत घडत असलेल्या या कथेत मग विविध रंजक वळणं येतात आणि या चिप्पाची गोष्ट पुढे सरकते. आपल्या वडिलांचा शोध घेण्याचा ध्यास आणि त्यातील विविध अडचणींचा भावनिक प्रवास चिप्पामधून घडतो. या सिनेमात सनीसोबत चंदन रॉय सन्याल, सुमीत ठाकूर, माला मुखर्जी,मसूद अख्तर आणि रोजिनी चक्रवर्ती यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन सफ्दार रेहमान यांचं असून सिनेमा येत्या सप्टेंबर महिन्यात रिलीज होईल असं समजतंय.