'यापुढे मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही', आत्महत्येच्या ३ दिवसआधी सुशांतने स्टाफला दिलेला पगार?

बी टाऊन
रोहित गोळे
Updated Jun 18, 2020 | 16:24 IST

Sushant Singh staff salary pay before Suicide: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीची नवीन माहिती समोर आली आहे.

Sushant Singh Rajput
सुशांत सिंह राजपूत  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • सुशांत सिंह राजपूतने आत्महत्येच्या ३ दिवस आधी कर्मचार्‍यांचा दिला होता पगार 
  • पगार देताना कर्मचार्‍यांना सांगितले की, यापुढे आणखी पैसे देता येणार नाही!
  • सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून सुरु आहे सखोल चौकशी 

मुंबईः बॉलिवूडमध्ये यशाची शिडी वेगाने चढणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा या जगात नाही हे अद्यापही अनेकांना स्वीकारणे कठीण जात आहे. रविवारी (१४ जून) बॉलिवूडने आपल्यातील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक असलेला सुशांत सिंह राजपूत याला गमावलं. ३४ वर्षीय अभिनेत्याने वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या  केली.  १५ जून रोजी त्याच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी त्यांच्या अस्थींचे विसर्जन पटनामध्ये करण्यात आले.

सध्या मुंबई पोलीस त्याच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी करत आहेत. एका ताज्या रिपोर्टनुसार, पोलिसांच्या सूत्रांनी अशी माहिती दिली की,  सुशांतने आत्महत्येच्या ३ दिवसआधी आपल्या सर्व कर्मचार्‍यांना पगार दिला होता. (Sushant Singh Rajput Staff Salary)

'आता मी तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही'

टाइम्स नाऊला मिळालेल्या माहितीनुसार, तपासात असे आढळून आले आहे की, आपल्या सर्व कर्मचार्‍यांना पगार देताना सुशांतने  सांगितले होते की, त्यांना यापुढे पैसे देणे शक्य होणार नाही. त्यावर त्याच्या कर्मचार्‍यांनी कथित स्वरुपात असे उत्तर दिले की, 'तुम्ही आम्हाला इतके दिवस सांभाळले आहे, आम्ही पुढे काही ना काही नक्कीच करू.'

सुशांत एक्स मॅनेजरच्या संपर्कात होता?

एका रिपोर्टनुसार, सुशांतच्या मॅनेजरने असा खुलासा केला आहे की, सुशांत हा आपली एक्स मॅनेजर दिशा सलियन (dishasalian) हिच्या संपर्कात होता. जिने ९ जून रोजी आत्महत्या केली. एका वेब सीरिजमधील मुख्य भूमिकेसाठी त्याला १४ कोटी रुपये मिळणार होते. पण दिशाच्या आत्महत्येच्या बातमीनंतर सुशांतवर गंभीर परिणाम झाल्याचे मॅनेजरने सांगितले. सुशांत आधीच नैराश्यात होता आणि त्यातच दिशाच्या आत्महत्याने त्याला मोठा धक्का बसला.

मात्र, दिशा सुशांतला वेब सीरिजमध्ये भाग घेण्यासाठी मदत करत होती की नाही हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांना पुरेसे पुरावे सापडलेले नाहीत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि आतापर्यंत १० जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आजच (गुरुवार) सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला देखील चौकशीसाठी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं होतं.

सुशांतच्या दुःखद आणि अकाली निधनाने पुन्हा एकदा मानसिक आरोग्य आणि इंडस्ट्रीमधील घराणेशाही या चर्चेला उधाण आले आहे. काही कलाकारांनी इंडस्ट्रीतील कठीण काळांबद्दल आपला अनुभव उघड केला आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान खान, करण जोहर, संजय लीला भन्साळी, आणि एकता कपूर यांच्यासह बॉलिवूडमधील आठ नामवंत निर्मात्यांवर खटला दाखल करण्यात आला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी