मुंबईः अभिनेता संदीप नाहर याने मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथे आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी संदीप नाहर याने एक मोठी फेसबुक पोस्ट लिहिली. या पोस्ट सोबत त्याने एक व्हिडीओ अपलोड केला. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. (Sushant Singh Rajput's 'M S Dhoni' co-star Sandeep Nahar dies by suicide; shares a note on Facebook)
संदीप नाहर याने सुशांत सिंह राजपूत याच्या अभिनयामुळे लोकप्रिय झालेल्या धोनी सिनेमात तसेच अक्षय कुमारच्या केसरी सिनेमात भूमिका साकारल्या होत्या. 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमात संदीप नाहर याने धोनीपेक्षा वयाने मोठा असलेला आणि खेळाच्या सामानाचे दुकान चालवणारा व्यावसायिक ही भूमिका साकारली होती. सिनेमात तो धोनीच्या खेळाचा चाहता दाखवला आहे. तर 'केसरी' सिनेमात संदीप नाहर याने एका जवानाची भूमिका साकारली होती.
कौटुंबिक आणि आर्थिक कारणांमुळे त्रस्त झालेल्या संदीप नाहर याने टोकाचे पाऊल उचलत असल्याचे जाहीर करुन नंतर आत्महत्या केली. पत्नी सतत संशय घेते, विनाकारण माझ्या कुटुंबातील सदस्यांना बोल लावते. मी नवे काम करण्यासाठी कोणाला भेटलो अथवा कोणाशी बोललो तर लगेच संशय घेऊन प्रश्नांचा भडीमार सुरू करते. काही दिवसांपूर्वी अचानक घर सोडून निघून गेली. तिला शोधून परत आणले आणि समजावले. पण तिच्या वागणुकीत बदल होत नाही. या प्रकारामुळे त्रस्त होऊन आत्महत्या करत असल्याचे संदीप नाहर याने फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.
पत्नीची मानसिक स्थिती व्यवस्थित नाही. पण ती सतत आत्महत्या करेन आणि त्यात तुला गोवेन अशी धमकी देते. पत्नीची आई कायम तिला साथ देते आणि मला सतत दबावाखाली ठेवते, असेही संदीप नाहर याने फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.
ज्या महिलेसोबत मी लग्न केले ती आधी एका व्यक्तीसोबत सहा वर्ष एकत्र राहात होती. पुढे दोघांमध्ये अंतर निर्माण झाले. हिच्याशी कोणी लग्न करण्यासाठी तयार नव्हते. या परिस्थितीमुळे हिने चुकीचे वर्तन करू नये म्हणून मी हिच्यासोबत स्वेच्छेने लग्न केले. पण या निर्णयाचे वाईट परिणाम भोगत आहे. पत्नी सातत्याने संशय घेऊन आणि प्रश्नांचा भडीमार करुन त्रास देते, माझ्या घरच्यांना बोल लावते असा आरोप संदीप नाहर याने केला आहे.
माझ्या आत्महत्येसाठी कोणाला जबाबदार धरू नये, अशी इच्छा संदीप नाहर याने शेवटच्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केली आहे. पत्नीवर मानसोपचार करण्याची गरज आहे, असेही त्याने फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे. ताज्या घडामोडींमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. आता जगण्याची इच्छा उरलेली नाही, असे जाहीर करुन नंतर संदीप नाहर याने टोकाचे पाऊल उचलले आहे.
पोलीस संदीप नाहर याने केलेल्या शेवटच्या फेसबुक पोस्ट आणि व्हिडीओआधारे चौकशी करत आहेत. चौकशीअंती निष्कर्ष सांगू, असे पोलिसांनी जाहीर केले. संदीपच्या पत्नीने त्याने गळफास लावून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. पोस्टमॉर्टेमचा अहवाल आल्यानंतर माहिती देऊ, असेही पोलिसांनी सांगितले. याआधी मागच्या वर्षी 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमात धोनी ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह राहत्या घरात मागच्या वर्षी १४ जून २०२० रोजी आढळला होता.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Actor Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूची चौकशी सुरू असताना मुंबईत लॉकडाऊन काळातही बंदी असलेल्या ड्रगचा पुरवठा व्यवस्थित सुरू होता, अशी माहिती हाती आली. यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग प्रकरणी स्वतंत्र तपासकाम सुरू केले. छापे टाकून तसेच संशयितांची चौकशी करुन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अनेकांना अटक केली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केलेल्यांपैकी काही जण जामिनावर आहेत तर काही जण तुरुंगात आहेत.
सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), रियाचा भाऊ शौविक (Showik Chakraborty) हे सशर्त जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. ड्रग प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दीपिका पदुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रकुलप्रीत सिंह (Rakul Preet Singh) या अभिनेत्रींची चौकशी केली. टॅलेंट मॅनजेर करिश्मा, टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि श्रुती मोदी तसेच फॅशन डिझायनर (fashion designer) सिमॉन खंबाटा (Simone Khambatta) यांचीही चौकशी झाली आहे. अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal), त्याची गर्लफ्रेंड, तिचा भाऊ आणि अर्जुनचा एक मित्र तसेच टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान या सगळ्यांनाही ड्रगच्या वेगवेगळ्या केसमध्ये चौकशीला सामोरे जावे लागले.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई महानगर प्रदेशात प्रामुख्याने मालाड, अंधेरी, खारघर आणि कोपरखैरणे या भागांमध्ये वारंवार छापे टाकत आहे. अंधेरीत लोखंडवाला कॉम्प्लेक्स आणि वर्सोवा या भागांतील हालचाली तसेच मालाडच्या पॉश समजल्या जाणाऱ्या भागांतील हालचालींवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे लक्ष आहे.