सुशांतला ड्रग पुरवणाऱ्याला अटक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला ड्रग पुरवल्याप्रकरणी एका व्यक्तीला गोव्यात अटक झाली. या व्यक्ती व्यतिरिक्त आणखी दोन जणांनाही गोव्यात अटक झाली.

sushants drug provider arrested in goa
सुशांतला ड्रग पुरवणाऱ्याला अटक 

थोडं पण कामाचं

  • सुशांतला ड्रग पुरवणाऱ्याला अटक
  • NCBने गोव्यात केली कारवाई
  • ड्रग प्रकरणी रिया चक्रवर्तीसह ३३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला ड्रग पुरवल्याप्रकरणी एका व्यक्तीला गोव्यात अटक झाली. या व्यक्ती व्यतिरिक्त आणखी दोन जणांनाही गोव्यात अटक झाली. अटक केलेल्या ३ जणांकडून ड्रगचा साठा जप्त करण्यात आला. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली. (sushants drug provider arrested in goa)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह राहत्या घरात मागच्या वर्षी १४ जून २०२० रोजी आढळला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Actor Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूची चौकशी सुरू असताना मुंबईत लॉकडाऊन काळातही बंदी असलेल्या ड्रगचा पुरवठा व्यवस्थित सुरू होता, अशी माहिती हाती आली. यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग प्रकरणी स्वतंत्र तपासकाम सुरू केले. छापे टाकून तसेच संशयितांची चौकशी करुन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अनेकांना अटक केली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केलेल्यांपैकी काही जण जामिनावर आहेत तर काही जण तुरुंगात आहेत. 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग प्रकरणी ३३ जणांविरोधात मुंबईच्या एनडीपीएस कोर्टात कंम्प्लेंट अर्थात आरोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. अभिनेत्री रिया चक्रवर्ती, रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतच्या घरातील नोकर दीपेश सावंत आणि इतर ड्रग पेडलर अशा ३३ जणांविरोधात आरोपपत्र आहे. १२ हजार पानांचे आरोपपत्र आणि डिजिटल पुरावा म्हणून ४० हजार पानांची सॉफ्ट कॉपी असा ५२ हजार पानांचा दस्तऐवज एनडीपीएस कोर्टात सादर झाला.

ड्रग केसमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २०० पेक्षा जास्त साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेत्री सारा अली खान यांची साक्षही नोंदवण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ज्या ३३ जणांवर आरोप ठेवला आहे त्यांच्यापैकी पाचजण अद्याप फरार आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही शोध मोहीम सुरू असतानाच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुशांतला ड्रग पुरवणाऱ्याला गोव्यात अटक केली. 

सध्या सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), रियाचा भाऊ शौविक (Showik Chakraborty) हे सशर्त जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. ड्रग प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दीपिका पदुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रकुलप्रीत सिंह (Rakul Preet Singh) या अभिनेत्रींची चौकशी केली. टॅलेंट मॅनजेर करिश्मा, टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि श्रुती मोदी तसेच फॅशन डिझायनर (fashion designer) सिमॉन खंबाटा (Simone Khambatta) यांचीही चौकशी झाली आहे. अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal), त्याची गर्लफ्रेंड, तिचा भाऊ आणि अर्जुनचा एक मित्र तसेच टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान या सगळ्यांनाही ड्रगच्या वेगवेगळ्या केसमध्ये चौकशीला सामोरे जावे लागले.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबई महानगर प्रदेशात प्रामुख्याने मालाड, अंधेरी, खारघर आणि कोपरखैरणे या भागांमध्ये वारंवार छापे टाकले. अंधेरीत लोखंडवाला कॉम्प्लेक्स आणि वर्सोवा या भागांतील हालचाली तसेच मालाडच्या पॉश समजल्या जाणाऱ्या भागांतील हालचालींवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सतत लक्ष ठेवले होते. तसेच डोंगरी परिसरातही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी