२०१९मधील या काही बॉलिवूड सिनेमांना २०० कोटींचा पल्ला गाठायला लागले किती दिवस

बी टाऊन
Updated Oct 09, 2019 | 16:26 IST | चित्राली चोगले

बॉलिवूड सिनेमांच्या कक्षा खूपच रुंदावतायेत. १०० करोड क्लब आता मागे पडला असून २०० करोड क्लब सध्या इन आहे. अनेक बॉलिवूड हिट या २०० कोटींचा पल्ला गाठतायेत.या हिट सिनेमांना नेमके किती दिवस लागलेत हा पल्ला गाठायला?

this is how many days these bollywood films took to reach the 200 crore mark mission mangal war kabir singh bharat uri
२०१९मधील या काही बॉलिवूड सिनेमांना २०० कोटींचा पल्ला गाठायला लागले किती दिवस  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • 2019मध्ये रिलीज झालेले, २०० कोटींचा पल्ला गाठणारे हे सिनेमे
  • २०० करोड क्लबमध्ये हे ४ सिनेमे दाखल पण लागला वेगळा वेळ
  • वॉर देखील लवकरच २०० कोटींचा पल्ला गाठणार?

मुंबई: बॉलिवूडमध्ये सिनेमांच्या कक्षा नक्कीच रुंदावत आहेत. सिनेमा लार्जर थॅन लाईफ तर होत आहेच तसंच सिनेमाचा नफा सुद्धा दिवसेंदिवस वाढतो आहे. सुपरहिट सिनेमांची कन्सेप्ट सुद्धा आता दिवसेंदिवस बदलताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी १०० करोड क्लब ही कॉन्सेप्ट हिटसाठी लागू झाली. त्यानंतर आता ही मागे पडली असून सध्या २०० करोड क्लबमध्ये काही सुपरहिट बॉलिवूड सिनेमे अगदी सहज पोहचताना दिसत आहेत. या वर्षी आत्तापर्यंत रिलीज झालेल्या काही हिट सिनेमांनी देखील हा २०० कोटींचा पल्ला पार केला आहे. पण प्रत्येक सिनेमाला तो पार करण्यासाठी वेगळा वेळ लागला आहे.

या २०० करोड क्लबमध्ये या वर्षी दाखल झालेले हे सगळे सिनेमे हिट असले तरी त्या प्रत्येक सिनेमाची आपली एक वेगळी ओळख आहे. तसंच त्या प्रत्येक सिनेमाने बॉक्स ऑफिसवर हा पल्ला गाठण्यासाठी त्यांचा-त्यांचा एक वेगळा वेळ घेतलेला आहे. या वर्षी २०० कोटी कमावण्यासाठी सगळ्यात कमी वेळ लागला आहे तो काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या कबीर सिंग सिनेमाला. शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांची केमिस्ट्री बघायला मिळालेल्या या सिनेमाने अवघ्या १३ दिवसात हा २०० कोटींचा पल्ला पार केला आहे.

 

याच यादीत दुसऱ्या स्थानावर येतो तो बॉलिवूडच्या भाईजान सलमान खानचा सिनेमा भारत. या वर्षी इदच्या मुहुर्तावर रिलीज झालेला हा सिनेमा सलमानसाठी लकी ठरला. त्याचे गेले काही सिनेमे पाहिजे तितके चालले नाहीत पण या सिनेमाने सलमानचा गड राखला. पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर सल्लू मियाँची कमाल दिसली आणि अवघ्या १४ दिवसात या सिनेमाने २०० कोटींच्या घरात प्रवेश केला. तिसऱ्या स्थानावर 'हाऊ इज द जोश...' म्हणत तग धरुन आहे उरी सिनेमा. विकी कौशलचा कमाल अभिनय आणि उत्तम कथा-दिग्दर्शनाने नटलेला हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिस हिट ठरला. या सिनेमाने हा २०० करोड क्लब २८ दिवसात गाठला आहे.

 

 

२०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणारा या वर्षातला पुढचा सिनेमा आहे मिशन मंगल. विद्या बालन, अक्षय कुमार, तापसी पन्नू, आदी कलाकारांच्या कसदार अभिनयाची झलक या सिनेमात दिसली आणि बघता-बघता सिनेमा हिट ठरला. सिनेमाला या २०० कोटींच्या क्लबमध्ये पोहचायला थोडा वेळा लागला असला तरी या क्लबमध्ये तो दाखल निश्चित झाला आहे. मिशन मंगलला हा २०० कोटींचा पल्ला गाठण्यासाठी तब्बल २९ दिवस लागले. हे सगळं असं असलं तरी या सगळ्या सिनेमांच्या वरचढ ठरणार आहे नुकताच रिलीज झालेला वॉर सिनेमा. कारण सध्या हा सिनेमा १६६ कोटींच्या घरात पोहचला आहे. त्यामुळे हा सिनेमा ७व्या दिवशी २०० कोटींचा पल्ला गाठेल असा अंदाज सध्या बांधला जात आहे. त्यामुळे कानामागून येऊन हा सिनेमा या सगळ्या सिनेमांच्या वरचढ ठरतो का ते पहावं लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...