Veteran Malayalam Singer Edava Basheer Collapses On Stage During Live Concert Dies Later : तिरुअनंतपुरम : एका कार्यक्रमात स्टेजवर गाणे गाताना प्रसिद्ध पार्श्वगायकाचे निधन झाले. ही धक्कादायक घटना भारतात केरळमध्ये घडली. मल्याळी पार्श्वगायक एदवा बशीर (Edava Basheer) यांचे निधन झाले.
गाणे गात असताना एदवा बशीर अचानक स्टेजवर कोसळले. त्यांना तातडीने चेरथाला येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. एदवा बशीर ७८ वर्षांचे होते. रविवारी दुपारी कडप्पकड जुमा मश्जिद कब्रस्तान येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एदवा बशीर अनेक वर्षांपासून ब्ल्यू डायमंड ऑर्केस्ट्रासाठी स्टेजवर गाणी गातात. शनिवारी २८ मे २०२२ रोजी केरळमधील कोलम जिल्ह्यातील पाथिरापल्लीमध्ये ऑर्केस्ट्राचा शो होता. यावेळी 'माना हो तुम बेहद हसीन' हे हिंदी गाणे सादर करत असताना एदवा बशीर अचानक स्टेजवर कोसळले.
शाळेत असल्यापासून मल्याळम संगीत विश्वात लोकप्रिय असलेल्या एदवा बशीर यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांनी संगीतालय नावाचा म्युझिक ग्रुप सुरू केला. दुर्गामातेवर आधारित अकसरुपिनी अन्नपूर्णेश्वरी या गाण्यामुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले. गाणी सादर करण्याच्या निमित्ताने त्यांनी जगभ्रमंती केली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी शोक व्यक्त केला. प्रसिद्ध पार्श्वगायिका के एस चित्रा यांनी ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली.