श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळच्या (Line of Control - LOC) तुलैल येथे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आला आहे. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज घाटातील तुलैलमध्ये बीएसएफच्या जवानांना भेटून त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अक्षय कुमार पोहोचला आहे. Akshay Kumar in Kashmir near LOC
अक्षय कुमार हेलिकॉप्टरमधून तुलैल भागातील नीरू गावात दाखल झाला. तो आज दुपारी (गुरुवार, १७ जून २०२१) बारा वाजता आला. नीरू गावात बीएसएफच्या जवानांसोबत गप्पा मारण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अक्षय कुमार आला आहे.
याआधीही अक्षय कुमारने देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन सीमेचे रक्षण करणाऱ्य़ा जवानांची भेट घेतली होती. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना सलामी देण्यासाठी तसेच देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना भेटून त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अक्षय कुमार अनेकदा लष्कराच्या अथवा सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना भेटला आहे. जवानांचा उत्साह वाढवण्यासाठी सलग काही तास त्यांच्यासोबत गप्पा मारणे आणि धमालमस्ती करणे अक्षय कुमारला आवडते.
कधी स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट), प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) तर कधी सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अक्षय कुमारने जवानांसाठी खास वेळ काढला होता. मागील काही वर्षांमध्ये अक्षय कुमार हा देशहिताचे सामाजिक संदेश देणाऱ्या तसेच देशभक्तीपर सिनेमांसाठी प्रसिद्ध झाला आहे.
अक्षय कुमारच्या गाजलेल्या देशहिताचे सामाजिक संदेश देणाऱ्या तसेच देशभक्तीपर सिनेमांची यादी - नमस्ते लंडन (२००७), हॉलिडे : अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्युटी (२०१४), बेबी (२०१५), एअरलिफ्ट (२०१६), टॉयलेट : एक प्रेम कथा (२०१७), गोल्ड (२०१८), पॅडमॅन (२०१८), मिशन मंगल (२०१९), केसरी (२०१९)