[VIDEO]: नवाजुद्दीन सिद्दीकी-आथिया शेट्टीच्या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर हसून हसून व्हाल लोटपोट

बी टाऊन
Updated Oct 11, 2019 | 19:54 IST

"मोतीचूर चकनाचूर" या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर कॉमेडी असून यातील अभिनेता आणि अभिनेत्रीची जोडीसुद्धा एका वेगळ्याच भूमिकेत दाखवण्यात आली आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'मोतीचूर चकनाचूर' हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट रोमँटिक आणि कॉमेडी आहे. तसेच, या कॉमेडी चित्रपटाच्या माध्यमातून नवाजुद्दीन सिद्दीकीच्या जोडीला आथिया शेट्टी दिसणार आहे. प्रदर्शित झालेला चित्रपटाचा ट्रेलर हा खूपच "फनी" आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेता नवाजुद्दीन हा पुष्पिंदर त्यागी या पुरूषाच्या भूमिकेत आणि आथिया ही अॅनी या महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे.

या सिनेमाचं  पोस्टर प्रदर्शित झालं असून या ट्रेलरच्या सुरुवातीलाच नवाज आणि आथिया लग्नाच्या पेहरावात दिसत आहेत. या चित्रपटात नवाज म्हणजेच "पुष्पिंदरच" लग्न हे वय उलथुन गेलं असलं तरी होत नाही. त्यामुळे लग्न करण्यासाठी तो मुलीच्या शोधात असतो. दुसरीकडे आथिया म्हणजेच "अॅनीला" सुद्धा लग्न करण्यासाठी परदेशात काम करणारा मुलगा हवा असतो. त्यावेळी, तिला पुष्पिंदरबाबतची माहिती मिळते आणि नंतर पुष्पिंदरशी लग्न करायचं ठरवते. मात्र लग्न झाल्यावर काय होतं ते पाहण्यासाठी आपल्याला चित्रपट पहावा लागणार आहे.

मोतीचूर चकनाचूर या चित्रपटाचे दिग्दर्शक देबामित्र बिश्वाल आहेत. तसेच हा चित्रपट पुढील महिन्यात १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट पाहून नक्कीच सगळ्यांचं हसुन-हसुन पोट दुखणार आहे. असा हा आगळा-वेगळा आणि कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला दोघांच्याही चाहत्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी