ड्रग्स प्रकरणातील मोठा खुलासा, दीपिका पदुकोण 'त्या' व्हाट्सअॅप ग्रुपची अ‍ॅडमिन होती: सूत्र

बी टाऊन
रोहित गोळे
Updated Sep 25, 2020 | 18:43 IST

Bollywood Drugs Case: ड्रग्सप्रकरणी बॉलिवूडमधील बडे कलाकार हे नार्कोटिक्स ब्युरोच्या रडारवर आहेत. याचदरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्याविषयी एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. 

deepika padukone
दीपिका पदुकोण  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • दीपिका पदुकोण २६ सप्टेंबर रोजी नार्कोटिक्स ब्युरोसमोर हजर होणार आहे
  • दीपिका पदुकोणची ड्रग्स प्रकरणी केली जाणार चौकशी
  • नार्कोटिक्स ब्युरोच्या प्रश्नांना कशी देणार दीपिका उत्तरं?

मुंबई: Bollywood Drugs Case: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूनंतर संपूर्ण बॉलिवूड विश्व ढवळून निघालं आहे. त्याच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणाची व्याप्ती आता फार मोठी असल्याचं दिसून येत आहे. कारण या चौकशीतून आता अनेक बड्या सेलिब्रिटींची नावे समोर येऊ लागली आहेत. जे आता अडचणीत देखील येत आहेत. सर्वात आधी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ही एनसीबीच्या (NCB) रडारवर आली. जिने चौकशीत ड्रग्स मागविल्याचे कबूल केलं होतं. एनसीबीने तिला याप्रकरणी तुरूंगात डांबलं आहे. याच दरम्यान, एक अत्यंत मोठा असा खुलासा झाला की, ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये (WhatsApp) ड्रग्सबाबत चर्चा व्हायची त्या ग्रुपची अॅडमिन (Admin) ही दीपिका पदुकोण (Deepika Padukone) असल्याचं समोर येत आहे.

नार्कोटिक्स ब्युरोने व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग या अभिनेत्रींना समन्स पाठविले आहेत. शुक्रवारी एनसीबीने रकुल प्रीत सिंग हिची चौकशी केली. ज्यामध्ये तिने कबूल केले की, तिचं रिया चक्रवर्तीशी ड्रग्जविषयी बोलणं झालं होतं. आता शनिवारी दीपिका पदुकोण एनसीबीसमोर हजर होणार असून तिची देखील याप्रकरणी चौकशी केली जाईल.

दरम्यान, टाइम्स नाऊला एनसीबीच्या सूत्रांकडून माहिती मिळाली की, ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ड्रग्जविषयी बोललं जात होतं त्याची अॅडमिन ही दीपिका पदुकोण होती. हा ग्रुप २०१७ साली बनविण्यात आला होता. ज्यामध्ये जया शाह आणि करिश्मा प्रकाश यांचा देखील समावेश होता. याच ग्रुपमध्ये दीपिका आणि करिश्मा यांच्यात ड्रग्जविषयी चर्चा झाली होती.

एनसीबी नेमके कोणते प्रश्न विचारणार आहे त्याची माहिती टाइम्स नाऊला सूत्रांद्वारे मिळाली आहे. हे तेच प्रश्न आहेत जे एनसीबी दीपिका पदुकोणला विचारेल आणि त्यांची उत्तरे जाणून घेईल. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीची टीम दीपिका पदुकोणची चौकशी करेल. 

  1. ज्यात पहिला प्रश्न असेल: २०१७ मध्ये तुम्ही कधी Hash-Weed ची मागणी केली होती का? 
  2. दुसरा प्रश्न: आपल्या चॅटमध्ये 'माल' शब्दाचा अर्थ काय आहे? 
  3. तिसरा प्रश्न: आपण कधी करिश्मा प्रकाश कडून ड्रग्स घेतले किंवा विकत घेतले होते का? 

अशाच प्रकारचे अनेक प्रश्न एनसीबी दीपिकाला विचारु शकतं.  या प्रश्नांची दीपिका काय उत्तरं देते हे जाणून घेण्याचा एनसीबी प्रयत्न करेल आणि त्यानंतर पुढे नेमकं काय पाऊल उचलायचं हे ठरवलं जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी