रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्समधून खुलासा, मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्याच्या होती संपर्कात

Rhea Chakraborty: सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या कॉल डिटेल्सनुसार ती मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संपर्कात असल्याचं दिसत आहे.

Rhea Chakraborty
अभिनेत्री रिया चक्रवर्ती   |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणीत होतेय वाढ 
  • अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्सवरुन झाला खुलासा, रिया मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संपर्कात होती
  • मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी 

मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच ईडीनेही रियाची चौकशी सुरू केली आहे. त्यातच आता रिया चक्रवर्तीचे कॉल डिटेल्स (Rhea Chakraborty Call Details) हाती आले असून त्यावरुन काही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे कॉल डिटेल्स टाइम्स नाऊच्या हाती आले आहेत. रियाच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR)नुसार ती मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सातत्याने संपर्कात असल्याचं दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वी बिहार पोलीस दलाचे महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं होतं की, रिया चक्रवर्ती मुंबई पोलिसांच्या संपर्कात असल्याची कोणतीही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाहीये. त्यानंतर आता रियाच्या सीडीआरनुसार ती मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

सुशांतच्या वडिलांनी बिहारमधील पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पाटणा पोलिसांच एक पथक मुंबईत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, त्यांना रिया चक्रवर्तीची चौकशी करता आली नाही कारण रिया नेमकी आहे कोठे याची माहितीच बिहार पोलिसांना नव्हती.

या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला हिला अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर रिया चक्रवर्ती आज (७ ऑगस्ट २०२०) ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात दाखल झाली. यावेळी रिया चक्रवर्तीसोबत तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती देखील होता. 

अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या विरोधात बिहारमधील पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर ही एफआयआर बिहारमधून मुंबईत हस्तांतरित करण्यासाठी रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ५ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही पक्षांना पुढील तीन दिवसांत आपले उत्तर देण्यास सांगितले आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी आता एका आठवड्यात होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी