सुशांत प्रकरणी सीबीआय मुंबईच्या दोन डीसीपींची चौकशी करणार

Sushant Singh Rajput CBI to quiz two DCP of Mumbai Police सुशांत प्रकरणात आतापर्यंत मुंबई पोलिसांनी जी कारवाई केली त्यात सहभागी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करणार

Sushant Singh Rajput CBI to quiz two DCP of Mumbai Police
सुशांत प्रकरणी सीबीआय मुंबईच्या दोन डीसीपींची चौकशी करणार 

थोडं पण कामाचं

  • सुशांत प्रकरणी सीबीआय मुंबईच्या दोन डीसीपींची चौकशी करणार
  • वांद्रे येथील ज्या घरात सुशांतचा मृत्यू झाला तिथे सीबीआय जाणार
  • सीबीआय मुंबई पोलिसांकडून त्यांनी सुशांत प्रकरणी केलेल्या सर्व कारवाईची माहिती घेणार

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Actor Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी सीबीआय (CBI) मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाच्या दोन डीसीपींची चौकशी करणार आहे. डीसीपी त्रिमुखे रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिच्या सतत संपर्कात होते असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. या वृत्तातले तथ्य तपासणे आणि अन्य काही मुद्यांची माहिती घेण्यासाठी सीबीआय डीसीपी त्रिमुखेंची चौकशी करण्याची शक्यता आहे. तसेच सुशांत प्रकरणात आतापर्यंत मुंबई पोलिसांनी जी कारवाई केली त्यात सहभागी अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. (Sushant Singh Rajput CBI to quiz two DCP of Mumbai Police)

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुशांतचे मेव्हणे आणि वरिष्ठ आयपीएस ओ पी सिंह (O P Singh) यांनी वांद्रे पोलीस उपायुक्त परमजीत सिंह दहिया यांना मेसेज करुन सुशांतच्या जीवाला धोका असल्याची शक्यता कळवली होती. हा मेसेज मिळाल्यावर उपायुक्तांनी दखल घेत आहोत  (Noted) असा रिप्लाय पाठवला मात्र पुढे कोणतीही कारवाई केली नाही. मुंबई पोलिसांची या प्रकरणातही चौकशी होणार आहे.

बिहार पोलिसांनी सुशांतचे वडील के के सिंह (K K Singh) यांनी केलेली तक्रार दाखल करुन या प्रकरणात मुंबईत मर्यादीत तपास केला. या तपासानंतर बिहार पोलिसांनी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने बिहार पोलिसांची कृती वैध ठरवली.

सीबीआयने तपास हाती घेताच बिहार पोलिसांकडून त्यांनी केलेल्या तपासाची माहिती घेतली. मुंबईत दाखल झाल्यावर सीबीआयने मुंबई पोलिसांच्या कारवाईची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. सुशांतचा मृत्यू तसेच त्याच्याशी संलग्न असलेल्या आणि सुशांतच्या मृत्यूशी संलग्न असू शकतील अशा सर्व प्रकरणांचा तपास करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाआधारे सीबीआयने बिहार पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याकडे असलेली सुशांत प्रकरणाची माहिती घेतली. सीबीआयचे पथक आता मुंबई पोलिसांकडून सुशांत प्रकरणातील त्यांच्या कारवाईची सविस्तर माहिती घेईल. 

वांद्रे येथील ज्या घरात सुशांतचा मृत्यू झाला तिथे सीबीआय जाणार आहे. मुंबई पोलिसांच्या नोंदीआधारे सीबीआय सोबतचे फॉरेन्सिकचे पथक १४ जून २०२०च्या घटनेचा देखावा उभा करणार आहे. या प्रक्रियेद्वारे नेमके काय घडले हे समजून घेऊन पुराव्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. 

सुशांतचा मृत्यू १४ जून रोजी झाला होता. त्याने गळफास लावून घेतला, अशा स्वरुपाचा डेथ रिपोर्ट मुंबई पोलिसांनी तयार केला आणि एफआयआर न नोंदवता ५६ जणांची साक्ष घेतली होती. मात्र सुशांत प्रकरणी सीबीआयला तपासाचे आदेश देण्यात आल्यामुळे सीबीआयचे पथक नव्याने तपास आणि चौकशी करणार आहे. सीबीआय कशा प्रकारे कारवाई करते याकडे अनेकांचे लक्ष आहे. घटनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाल्यामुळे ठोस पुराव्यांचे संकलन करुन तपास करणे हे सीबीआयच्या पथकापुढचे सर्वात मोठे आव्हान आहे. 

महाविकास आघाडीत मतभेद

सीबीआय चौकशीवरुन महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत मतभेद आहेत. शिवसेनेचा सीबीआय चौकशीला विरोध दिसत आहे. याउलट कायद्याचे राज्य ही प्रतिमा राखण्यासाठी सीबीआय चौकशीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे मत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष व्यक्त करत आहेत. सुशांत प्रकरणात सीबीआयला विरोध केल्यास राष्ट्रीय राजकारणात कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसने सीबीआय तपासाला विरोध करणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. 

अशी आहे सुशांतच्या वडिलांची तक्रार

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीसोबतच इतर पाच जणांविरोधात आयपीसी कलम ३०६ (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे), ३४१ (चुकीच्या पद्धतीनं थांबवणे), ३४२ (चुकीच्या पद्धतीने बंदी घालणे), ३८० (घरात चोरी करणे), ४०६ (विश्वासघात करणे), ४२० (छळ करणे आणि अप्रामाणिकपणे मौल्यवान वस्तू, संपत्ती देण्यासाठी प्रेरित करणे) या कलमांतर्गत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत रियाला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही तक्रार सुशांत प्रकरणातील झिरो एफआयआर ठरवली आहे. या तक्रारीआधारे तपास सुरू आहे. ईडी सुशांतच्या पैशांची अफरातफर झाली की नाही याचा आणि सीबीआय सुशांतच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठीचा तपास करत आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी