बॉलिवूडचा 'चिंटू' गेला, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

बी टाऊन
Updated Apr 30, 2020 | 11:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी मुंबईच्या रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये अखेरचा  श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते.

rishi kapoor
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन
  • मुंबईच्या रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये घेतला अखरेचा श्वास
  • ऋषी कपूर ६७ वर्षांचे होते

मुंबईः बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी मुंबईच्या रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये अखेरचा  श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते. मनोरंजनसृष्टीत ते चिंटू  या नावाने प्रसिद्ध  होते. 

तब्येत बिघडल्यामुळे ऋषी कपूर यांना एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. पण आज सकाळी सर्व प्रयत्न अपयशी ठरले. आदल्याच दिवशी अभिनेता इरफान खान याच्या निधनामुळे बॉललिवूडमध्ये शोककळा पसरली होती. लागोपाठ ही दुसरी दुःखद बातमी धडकली आहे. सलग दोन दिवसांमध्ये बॉलिवूडच्या २ प्रथितयश कलाकारांचे निधन झाले.

कॅन्सरचे रुग्ण असलेल्या ऋषी कपूर यांची तब्येत एकदम खालावली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे पत्नी नीतूसिंह यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. या वृत्ताला काल (बुधवारी) ऋषी यांचे ज्येष्ठ बंधू रणधीर कपूर यांनी दुजोरा दिला होता.

rishi kapoor

ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याचे निदान २०१८ मध्ये झाले होते. अमिताभ बच्चन यांच्यासोबत '१०२ नॉट आऊट' या सिनेमाचे शूटिंग केल्यानंतर ऋषी कपूर उपचारासाठी न्यूयॉर्क येथे गेले होते. न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन वर्षभरानंतर ऋषी कपूर मुंबईत आले. मुंबईत आल्यावर काही दिवसांनी जुही चावलासोबत 'शर्माजी नमकीन' या हिंदी सिनेमाचे शूटिंग करण्यासाठी ऋषी कपूर दिल्लीला गेले होते. शूटिंग सुरू असताना तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी काम थांबवून मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला.

ऋषी कपूर यांनी इमरान हाश्मीसोबत 'द बॉडी' या सिनेमात काम केले. हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा सिनेमा. लवकरच ऋषी 'द इंटर्न' या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार होते. या सिनेमात ऋषी कपूर यांच्यासोबत दीपिका पदुकोन दिसणार होती.

फेब्रुवारीत २ वेळा हॉस्पिटलमध्ये घेतले उपचार

ऋषी कपूर यांना तब्येत बिघडल्यामुळे यंदा फेब्रुवारीत २ वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. एरवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असणाऱ्या ऋषी कपूर यांनी २ एप्रिलनंतर एकही ट्वीट केलेले नाही.  अलिकडेच त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केलेल्या माहितीत 'द इंटर्न' या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करणार असल्याची माहिती दिली होती.

बॉलिवूडसाठी वाईट बातम्यांचा दिवस

बॉलिवूडसाठी बुधवार (२९ एप्रिल) वाईट बातम्यांचा दिवस ठरला. सकाळीच अभिनेता इरफान खानने मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. जेमतेम ५३-५४ वर्षांचा इरफान गेल्याचा धक्का बॉलिवूडला बसला. या धक्क्यातून सावरण्याआधीच संध्याकाळी उशिरा ऋषी कपूर मुंबईच्या एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याची बातमी आली. पाठोपाठ आज (गुरुवारी) सकाळीच ऋषी कपूर यांच्या निधनाचे वृत्त आले. 

शूटिंग थांबले, कलाकार सेट ऐवजी घरातच बसले

कोरोना संकटामुळे मनोरंजनसृष्टीचे काम ठप्प आहे. शूटिंग थांबल्यामुळे एरवी सेटवर वावरणारे कलाकार सध्या घरी बसून आहेत. सार्वजनिक ठिकाणी जाण्यायेण्यावर निर्बंध लागू आहेत. अंत्यविधी सारख्या प्रसंगासाठी किती नागरिकांनी उपस्थित राहायचे याच्यावरही बंधन लागू झाले आहे. याच बंधनामुळे इरफानच्या अंत्यसंस्कारासाठी फक्त कुटुंबातील व्यक्तीसोडून इतरांना उपस्थित राहणे शक्य झाले नाही. हे संकट टळेल या आशेवर जगत असलेल्या मनोरंजनसृष्टीला हरहुन्नरी इरफान खान याच्या पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने धक्का बसला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी