मुंबई : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विवेक ओबेरॉय आपल्या पत्नीसोबत दुचाकीवरुन फिरताना दिसत आहे. हा व्हिडिओ १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे (Valentine Day)च्या दिवशीचा आहे. हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे याचं कारण म्हणजे दुचाकी चालवताना विवेकने हेल्टेट घातलेलं नाहीये आणि चेहऱ्यावर मास्कही लावलेलं नाहीये.
विवेक ओबेरॉयचा हा व्हिडिओ समोर येताच एका सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे वाहतूक नियमांच्या उल्लंघन केल्याने कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर वाहतूक पोलिसांनी विवेक ओबेरॉयला विना हेल्मेट गाडी चालवण्या प्रकरणी ई-चालान जारी केले आहे. सांताक्रुझ पोलिसांनी या प्रकऱणी विवेकला दंड ठोठावला आहे.
अभिनेता विवेक ओबेरॉय याने १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत विवेक ओबेरॉय आपल्या पत्नीसोबत 'साथिया' सिनेमातील स्टाईलने बाईक चालवत आनंद घेताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना विवेकने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, मी, माझी पत्नीसोबत या सुंदर व्हॅलेंटाईन डेची सुरुवात.
मात्र, याच व्हिडिओने अभिनेता विवेक ओबेरॉयला अडचणीत आणले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला दंड ठोठावला आहे.