आजारपणावर मात करत अभिनेते शरद पोंक्षे रंगभूमीसाठी पुन्हा एकदा सज्ज

नमन नटवरा
Updated Sep 23, 2019 | 21:37 IST | चित्राली चोगले

मराठी रंगभूमीवर अनेक जुनी नाटकं नव्याने भेटीला येत असतात. असंच एक १९७२ साली अजरामर ठरलेलं नाटक, हिमालयाची सावली आता नव्याने भेटीसाठी सज्ज झालं आहे. नाटकासोबतंच पुन्हा रंगभूमीवर दिसणार आहेत अभिनेते शरद पोंक्षे.

actor sharad ponkshe to be back on stage after recovering from cancer with famous marathi play from 1972 himalayachi savli
अजरामर नाटक हिमालयाची सावली आणि प्रदिर्घ आजारातून बरे झालेले अभिनेते शरद पोंक्षे रंगभूमीसाठी पुन्हा एकदा सज्ज 
थोडं पण कामाचं
  • १९७२मध्ये मराठी रंगभूमी गाजवलेलं नाटक हिमालयाची सावली नव्याने रंगभूमीवर अवतरणार
  • गंभीर आजारातून नुकतेच बरे झालेले अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा एकदा अभिनयासाठी सज्ज
  • येत्या २९ सप्टेंबरपासून नाटकाचा शुभारंभ

मुंबई: मराठी रंगभूमीवर अनेक नाटकं होऊन गेली. त्यातली काही काळाच्या ओघात विसरली गेली तर काही अशी नाटकं पण आहेत जी अजरामर ठरली. अनेक वर्षांपूर्वी रंगभूमी गाजवलेल्या अनेक कलाकृती आजच्या काळातही तितक्याच भावतात आणि कमाल करुन जातात. अनेक नाटकांचा पुनःप्रत्ययाच्या आनंद आपल्याला प्रेक्षक म्हणून अनुभवायला मिळतो आणि आपल्यातील नाट्यरसिक सुखावतो. ही सगळी कधी काळी आलेली नाटकं काहीतरी विचार देऊ पाहण्याच्या उद्देशाने नव्याने रंगभूमीवर येत असतात. याच मांदियाळीतलं प्रा. वसंत कानेटकर यांच्या लेखणीने सजलेलं आणि डॉ. श्रीराम लागू, शांता जोग, अशोक सराफ या दिग्गजांच्या अदाकारीने गाजलेलं ‘हिमालयाची सावली'  हे नाटक नवीन संचात लवकरच रसिकांसमोर येण्यासाठी सज्ज झालं आहे. 

१९७२ मध्ये हे नाटक सर्वप्रथम रंगभूमीवर आलं होतं आणि या नाटकाने तेव्हा प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता तब्बल ४० वर्षांनी पुन्हा एकदा हे नाटक नाट्यरसिकांच्या रंजनासाठी दाखल होणार आहे. नव्या संचामध्ये ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे हे श्रीराम लागू यांनी निभावलेली नानासाहेबांची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकतेच ते एका गंभीर आजारातून बरे झाले असून नव्या जोमाने हा शिवधनुष्य पेलण्यासाठी ते पुन्हा सज्ज झाले आहेत. या एवढ्या मोठ्या नाटकासाठी लागणारी मेहनत त्यांच्याकडून घेतली जात आहे ते पाहुन एक वेगळाच हुरुप येतो. त्यांच्या सध्याच्या प्रकृतीकडे बघून त्यांची मेहनत-चिकाटी बघून त्यांच्याकडून खरंच प्रेरणा घेण्यासारखं आहे. त्यांच्यासोबत शृजा प्रभूदेसाई, जयंत घाटे, विघ्नेश जोशी, कपिल रेडेकर, ओमकार कर्वे, कृष्णा राजशेखर, प्रकाश साबळे, मकरंद नवघरे, रुतुजा चीपडे, पंकज खामकर यांच्या भूमिका आहेत.

हिमालयाची सावली हे नाटक त्या काळी तीन अंकांचं होतं. सध्या मात्र वेळेची मर्यादा असते. असं असताना सुद्धा या नाटकाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकाने हे नाटक तीन अंकीच ठेवायचं ठरवलं आहे. त्यासाठी ते वेगळे प्रयत्न देखील करत आहेत. प्रकाश देसाई प्रतिष्ठान (पाली) व अद्भुत प्रॉडक्शन्स निर्मित व सुप्रिया प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या या नाटकाचे प्रस्तुतकर्ते गोविंद चव्हाण व प्रकाश देसाई असून नाटकाचे दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे. नुकतीच या नाटकाची पत्रकार परिषद संपन्न झाली पत्रकार परिषदेला उपस्थित प्रा. वसंत कानिटकर यांचा नातू अंशुमन कानेटकर यांनी यावेळी ‘हिमालयाची सावली’ च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

एका व्रतस्थ समाज कार्यकर्त्याच्या पत्नीला कशाप्रकारे अवघं आयुष्य जगावं लागतं या आशयाचं हे नाटक जुन्या काळाची एक रम्य मुशाफिरी ठरणार आहे. त्या काळातील दिग्ग्जांनी गाजवलेलं नाटक आम्हाला करायला मिळणं हे आमच्या प्रत्येकासाठी भाग्याचं असून आता या नाटकाला योग्य तो न्याय देण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याची भावना निर्माते, दिग्दर्शक तसेच कलाकार व्यक्त करतात. मूळ संहितेशी प्रामाणिक राहून नाटकाला न्याय देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न असल्याचे दिग्दर्शक राजेश देशपांडे सांगतात. त्यांनी नाटकातील एकही वाक्य बदललेलं नाही असं सुद्धा सांगितलं. या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रविवार २९ सप्टेंबरला कानेटकरांच्या भूमीत नाशिक येथील ‘कालिदास’ नाट्यगृहात होणार आहे. तर पुढील प्रयोग खालील प्रमाणे असतील,

  1. सोमवार ३० सप्टेंबर  दुपारी ३.३० वा. शिवाजी मंदिर, दादर
  2. मंगळवार १ ऑक्टोबर रात्रौ ८.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले
  3. बुधवार २ ऑक्टोबर सायं. ५.०० वा. यशवंतराव चव्हाण, कोथरूड
  4. शुक्रवार ४ ऑक्टोबर दुपारी ४.०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी