म्हणून अभिनेता सुमीत राघवनने नाटकाचा प्रयोग मध्येच थांबवला

नमन नटवरा
Updated Jun 04, 2019 | 19:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

A mobile ring makes Actor Sumeet Raghvan stop performance: अभिनेता सुमीत राघवनने एका फेसबुक पोस्टद्वारे त्याचा संताप व्यक्त केला आहे. ज्यामध्ये मोबाईल वाजल्याने नाटकाचा प्रयोग सुमीतने थांबवला, त्यावर तो बोललाय.

Actor Sumeet Raghvan angry as phone rings during live performance play Knock Knock Celebrity
‘नॉक नॉक सेलिब्रिटी’च्या प्रयोगादरम्यान मोबाईल वाजल्याने मुख्य अभिनेता सुमीत राघवनने प्रयोग थांबवला  |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई: अभिनेता सुमीत राघवन सध्या दोन आघाडीची नाटकं करत आहे. 'हॅम्लेट' आणि 'नॉक नॉक सेलिब्रिटी' या त्याच्या नाटकांचे सतत प्रयोग सुरु आहेत. अशाच 'नॉक नॉक सेलिब्रिटी' या नाटकाच्या नाशिकच्या प्रयोगादरम्यान एक प्रकार घडला आणि त्यावर सुमीतने त्याच्या फेसबुकवर व्यक्त होणारी एक पोस्ट शेअर केली आहे. झालं असं की, नाशिकच्या कालिदास कलामंदिरात सुमीतचा 'नॉक नॉक सेलिब्रिटी' या नाटकाचा प्रयोग ऐन रंगात आला असताना एका प्रेक्षकाच्या मोबाइलची रिंग वाजली आणि याच प्रयोगादरम्यान हे बराच वेळ सुरु असल्यामुळे संतप्त झालेल्या सुमीतने नाटकाचा प्रयोग अखेर थांबवलाच.

यानंतर अनेक ठिकाणी यावर प्रतिक्रिया उमटल्या. अनेक बातम्या ही पसरल्या पण त्यामागची खरी परिस्थिती काय होती त्याचं खरं कारण अखेर सुमीतने त्याच्या फेसबुक पोस्टमधून उघड केलंय. शिावय या पसरत असलेल्या बातम्यांमध्ये एक गोष्ट मात्र अधोरेखीत व्हायची राहुन जात आहे. ती म्हणजे सुमीतने जरी चिडून 'नॉक नॉक सेलिब्रिटी' या नाटकाचा प्रयोग मध्येच थांबला असला तरी काही वेळाने त्याने प्रयोग पुन्हा सुरु केला आणि तो पूर्ण सुद्धा केला. त्यामुळे जाणकार रसिक मायबाप प्रेक्षकांचा मान त्याने नक्कीच राखला आहे. तर त्याच्या या फेसबुक पोस्टमधून पूूर्ण माहिती न देता अशा चुकीच्या बातम्या पसरल्यामुळे सुद्धा तो नाराज असल्याचं समोर येतं. कारण त्याच्या पोस्टची सुरुवातंच ‘थोडी नीट माहिती काढून किंवा माझ्याशी बोलून न्यूज दिली असती तर बरं झालं असतं.’ अशी होते.

या पोस्टमध्ये तो पुढे म्हणतो, “घडलं असं, वेगवेगळ्या लोकांचा मोबाईल वाजला त्या प्रयोगाला. प्लस एका गृहस्थाने दरवाजा उघडून आत बाहेर केलं, तसं करण्याला अजिबात आक्षेप नाही पण ते दार दर वेळी आदळायचं आणि मोठा आवाज व्हायचा, पुढे एक वयस्कर बाई दुस-या बाईला "अहो हळू बोला" असं बोलली, त्यावर‌ ती बाई दाराच्या बाहेर जाऊन बोलू लागली आणि ते बोलणं स्टेजवर एकू येत होतं आणि शेवटी एका पहिल्या रांगेतील प्रेक्षकाचा फोन वाजला आणि मी चिडून नाटक बंद केलं.” असं म्हणत त्याने आपली बाजू मांडली आहे.

याच पोस्टमध्ये तो पुढे जाऊन अशाच एका प्रसंगाची आठवण सांगत म्हणतो, “नाशिकच्याच एका प्रयोगाला, 'एक शून्य तीन' नावाच्या नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि फोन वाजला एका प्रेक्षकाचा. तर तो बोलू लागला फोन वर,मी आणि स्वानंदी टिकेकर स्टेजवर होतो. मी प्रयोग थांबवून त्या व्यक्तिकडे बघितलं तर त्याने हाताच्या इशा-याने "तुमचं चालू द्या" असं केलं आणि मी स्तब्ध झालो. तिकिट काढलं म्हणजे तुम्ही विकत घेतलं का आम्हाला? का म्हणून करावं‌ आम्ही नाटक? हा अपमान करून घेण्याकरता? म्हणजे एकीकडे नाट्यगृहांची दुरावस्था आहेच,तशा बकाल नाट्यगृहात काम करा वर आता प्रेक्षकांकडून अप्रत्यक्षरित्या असा अपमान सहन करा.” असं म्हणत कलाकारांना होणाऱ्या त्रासाबद्दलची ही दुसरी बाजू पुन्हा एकदा सुमीतने अधोरेखीत केली आहे असंच म्हणावं लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी