मुंबईकरांना 'हे' नाटक पाहता येणार विनामूल्य...

नमन नटवरा
Updated Apr 04, 2019 | 21:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

आमच्या 'ही' चं प्रकरण हे मराठी नाटक विनामूल्य पाहता येणार आहे. १२ एप्रिलला या नाटकाचा विशेष प्रयोग रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आला आहे.

marathi drama_facebook
मुंबईकरांना 'हे' नाटक पाहता येणार विनामूल्य...   |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई: मराठी नाटकांना आता पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसत आहे. बऱ्याचदा प्रेक्षकही चांगल्या मराठी नाटकांकडे पाठ फिरवताना दिसतात. पण हीच गोष्ट बदलण्यासाठी आता मुंबईच्या दादरमधील 'मुंबई बीट्स' या संस्थेने एक नवा प्रयत्न केला आहे. मुंबई बीट्सतर्फे  'आमच्या 'ही' चं प्रकरण' हे विनोदी मराठी नाटक नाट्यरसिकांसाठी विनामूल्य दाखविण्यात येणार आहे. मुंबई बीट्सने हा विशेष प्रयोग प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये  आयोजित केला आहे. १२ एप्रिल २०१९ ला संध्याकाळी ६.३० वाजता हा प्रयोग होणार आहे. 

'आमच्या 'ही' चं प्रकरण' या नाटकामध्ये भार्गवी चिरमुले, निखिल रत्नपारखी, नंदिता पाटकर, आनंद काळे, प्रियदर्शनी इंदलकर हे कलाकार आहेत. हलकंफुलकं आणि विनोद असलेलं हे नाटक या कलाकारांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणखीनच फुलवलं आहे. त्यामुळे असं मजेशीर नाटक पाहणं ही नाट्यरसिकांसाठी एक पर्वणीच ठरु शकते. 

दादरमधील सांस्कृतिक मंच हा सामाजिक कार्याची जाणीव ठेऊन महिला, युवक आणि आबालवृद्धांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सतत आयोजित करत असतात. या कार्यक्रमांमधून वेगवेगळ्या संकल्पना देखील पुढे येतात. तसेच वेगवेगळ्या विषयांवर यावेळी सखोल चर्चा देखील होतात. त्यानुसार प्रत्येक उपक्रमाची दिशाही ठरवली जाते. 

 

 

तसं पाहिल्यास मराठी माणसासाठी नाटक हा तसा जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी नाट्यसृष्टी ही अनेक वर्षापासून आपला वारसा जपत आली आहे. त्यामुळे मराठी नाट्यसृष्टी आजच्या युगात देखील समृद्ध होत राहावी यासाठीच आज अनेकजण सतत कष्ट घेत आहेत. यामुळेच अशा प्रकारे नाट्यरसिकांना थिएटरपर्यंत आणण्याचा प्रयत्न मुंबई बीट्सने केला आहे. 

या प्रयोगाच्या आधी ज्येष्ठ कलाकारांना कलारंजन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यंदाचे हे पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी प्रदान करण्यात येणार आहेत. दरम्यान, यावेळी नाटकाच्या विनामूल्य प्रवेशिका या नाटकाच्या दोन तास आधी नाट्यगृहाबाहेर उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या नाटकाचा विनामूल्य आनंद घेता येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी