ठाणे: अभिनेता भरत जाधव हा आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना हसवत असतो. मात्र, याच अभिनेत्याला असुविधेमुळे त्रासाला सामोरं जावं लागल्याची बातमी समोर आली आहे. नाट्यगृहांची कशी दुरावस्था आहे आणि त्यामुळे कलाकारांना कशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं हे भरत जाधव याने सांगितलं आहे. या संदर्भात भरत जाधव याने सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. भरत जाधव याने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.
मराठी सिनेमांना कधी चित्रपटगृह मिळत नाही तर नाट्यगृहांची दुरावस्था झाल्याने मराठी कलाकार अनेकदा यावर भाष्य करतात. आता पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे आणि तो म्हणजे प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव याच्यासोबत. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शनिवारी अभिनेते भरत जाधव यांचा नाट्यप्रयोग होता. त्यासाठी भरत जाधव आपल्या संपूर्ण टीमसह नाट्यगृहात पोहोचले. मात्र, काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचा एसी बंद असल्याने एसी बंद असल्यामुळे कलाकारांना उकाडा जाणवू लागला आणि सर्वच टीमला प्रचंड समस्यांचा सामना करावा लागला. यानंतर भरत जाधव यांनी सोशल मीडियात व्हिडिओ पोस्ट करुन या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे.
भरत जाधव यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे, "नमस्कार मी भरत जाधव... असा ओलाचिंब वाटतोय ना? घाबरु नका. पावसात भिजलो नाहीये. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने काशिनाथ घाणेकर या नाट्यगृहात माझा नाट्यप्रयोग सुरू आहे आणि एसी बंद आहे. भाडं घेतात पूर्ण, ही दुसरी की तिसरी वेळ आहे. एसी बंद आहे आणि एसी सुरु करण्यास सांगितलं तर हो चालू केला असं उत्तर मिळतं. काही होत नाही. मी घामाने भिजलो आहे आणि याची दखल कुणीही घेत नाही म्हणून मला इथं ऑनलाईन यावं लागलं. धन्यवाद."
काही दिवसांपूर्वी अभिनेता सुमीत राघवन याने सुद्धा सोशल मीडियात एक पोस्ट करत आपली व्यथा मांडली होती. सुमीत राघवन यांचा नाशिकच्या कालिदास कलामंदिरात 'नॉक नॉक सेलिब्रिटी' या नाटकाचा प्रयोग सुरू होता. हा नाटकाचा प्रयोग सुरू असताना एका प्रेक्षकाच्या मोबाइलची रिंगटोन वाजली. हा प्रकार बराच वेळ सुरू असल्याने अभिनेता सुमीत राघवन हा संतापला आणि त्याने आपल्या नाटकाचा प्रयोग मध्येच थांबवला. पण नाट्यगृहात झालेल्या या प्रकारामुळे सुमीत नाराज झाला आणि त्याने सोशल मीडियात पोस्ट करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती.