मुंबई: झी मराठीची पहिली नाट्य प्रस्तुती 'हॅम्लेट' हे मराठी नाटक गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. नाटकाची भव्य दिव्यता, नाटकात असलेल्या कलाकारांची व्यस्थता आणि त्याच्या निर्मिती व्यवस्थेत असलेला लवाजमा पाहता नाटकाचे प्रयोग त्या मनाने कमी होतात. पण नाटकाची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. या लोकप्रिय नाटकाचा नुकताच पार पडलेल्या एका प्रयोगाला एक खास उपस्थिती लाभली आणि सगळ्यांचे हृदय धक धक होऊ लागलं. कारण नाटकाच्या प्रयोगाला हजर होती बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित नेने हिनं. यावेळी पती श्रीराम नेने सुद्धा तिच्या सोबतीला होते. दोघांनी पूर्ण प्रयोग पाहिला शिवाय संपूर्ण टीमसोबत छान फोटो देखील काढले. नाटकाचा मुख्य नायक सुमीत राघवनसोबत तर माधुरीने मस्त धमाल फोटोशेशन केलं. हे फोटो खुद्द सुमीतने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केलेत. शिवाय त्याला झालेला आनंद देखील त्याने या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर म्हणजे 21 एप्रिल रोजी मुंबईतल्या रविंद्रनाट्य मंदिरात हा प्रयोग पार पडला. त्यामुळे सुमीतचा आनंद द्विगुणित झाला होता.
या सगळ्यावर सुमीतचं नेमकं काय म्हणणं आहे हे आम्ही त्याला विचारल असता तो म्हणाला, “खरंतर काय बोलू कळत नाहीये, म्हणजे गेले अनेक दिवस मी माधुरीला प्रयोगाला येण्याचं आमंत्रण देत होतो, पण ‘टोटल धमाल’ आणि ‘कलंक’मध्ये ती फारंच बिझी होती. या प्रयोगाचा सुद्धा मी नेहमीप्रमाणे मॅसेज तिला पाठवला आणि मला तिच्या मॅनेजरचा फोन आला की ती प्रयोगाला येणार आहे, खूपच खुश झालो मी, माझ्या वाढदिवसा अगोदर हे असं होणं म्हणजे माझ्यासाठी एक बेस्ट गिफ्ट होतं असंच म्हणेन मी.”
सुमीतने शेअर केलेले फोटो तर छान आहेतंच पण या फोटोसोबत सुमीतने एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. तो व्हिडिओ आहे नाटकाच्या साऊंड चेकचा. या साऊंड चेक व्हिडिओमध्ये सुमीत ‘तुमसे मिलके…’ गाणं गाताना दिसतोय आणि हे गाणं त्याने माधुरीला डेडीकेट केलं आहे.
‘बकेट लिस्ट’ या माधुरीच्या पहिल्या वहिल्या मराठी सिनेमात सुमीतने माधुरीच्या पतीची भूमिका साकारली होती, त्यावेळी शूटदरम्यान या दोघांची चांगलीच गट्टी जमली. ही मैत्री आजही कायम ठेवत माधुरीने सुमीतच्या नाटकाला हजेरी लावली आणि त्याच्यासाठी हे क्षण खास होऊन गेले. माधुरीला सुद्धा नाटक फारंच आवडलं असल्याचं समजतंय. विल्यिम शेक्सपिअर यांची गारूड घालणारी लेखणी नाटकात अनुभवायला मिळते. त्यातही मराठीत नाटकाची भाषा कमालिची आहे. तब्बल साडे चारशे वर्षांपेक्षा जास्त शेक्सपिअर यांची लेखणी लिहीली गेली असली तरी आजही त्याची जादू भुरळ घालणारी ठरते असं हे नाटक पुन्हा एकदा सिद्ध करतं.