रंगभूमीवरचा ‘अविष्कार’ हरपला, ज्येष्ठ रंगकर्मी अरूण काकडे यांचं निधन

नमन नटवरा
Updated Oct 09, 2019 | 17:38 IST | चित्राली चोगले

आविष्कार संस्थेचे अध्वर्यू ज्येष्ठ रंगकर्मी अरूण काकडे (काकडे काका) यांचं आज दुपारी निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. अविष्कार या नाट्यसंस्थेला नावारुपास आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

senior marathi theatre artist arun kakade passes away at 89
रंगभूमीवरचा ‘अविष्कार’ हरपला, ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं निधन  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • रंगभूमीवरचा ‘अविष्कार’ हरपला
  • ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन
  • ७ दशकं रंगभूमीवर कार्यरत असलेलं शांत वादळ शमलं

मुंबई : मुंबईतल्या 'आविष्कार' या नाट्यसंस्थचे अध्वर्यू ज्येष्ठ रंगकर्मी अरूण काकडे (काकडे काका) यांचं आज दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मुबंईतल्या राहत्या घरी त्यांचं देहावसान झालं. ते ८९ वर्षांचे होते. अविष्कार या नाट्यसंस्थेला नावारूपास आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सगळेच त्यांना प्रेमाने अरुण काका असंच म्हणत. अरुण काकडे म्हणजे तब्बल सात दशके प्रायोगिक रंगभूमीची सेवा करणारं एक मोठं नाव. मराठी नाट्य चळवळीत देखील त्यांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीतून शोककळा पसरली आहे. त्यांचं अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार आज रात्री 8 वाजता, पारसीवाडा स्मशानभूमी, सहार रोड, अंधरी (पूर्व) इथे होणार आहेत. 

९४व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष असलेले अरुण काकडे म्हणजेज सगळ्यांचे लाडके काकडे काका सुमारे ७ दशकं रंगभूमीवर कार्यरत होते. अविष्कार ही नाट्यसंस्था नावारुपास आणण्यामध्ये काकडे काकांचा सिंहाचा वाटा आहे असंच म्हणावं लागेल. त्यांनी लिहिलेलं 'अमका' हे आत्मचरित्र देखील गाजलं. काकडे यांना संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास-सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

रंगायन या मुंबईतल्या संस्थेमधून अरुण काकडे यांचा रंगभूमीवरील खरा प्रवास सुरु झाला. पुण्यातून काकडे मुबंईत आले आणि या संस्थेसोबत ते पुढे काम करु लागले. विजय तेंडुलकर, विजया मेहता, अरविंद देशपांडे, आदी पुढे मोठी झालेली रंगभूमीवरची नावं त्यावेळी या संस्थेशी जोडलेली होती. संस्थेची नाटकं उत्तम सुरु असतानाच संस्थेमध्ये फूट निर्माण झाली आणि वाद होऊ लागले. अखेर ही संस्था कोलमडली. त्यातून विजया मेहता, सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे आणि अरुण काकडे यांनी एकत्र येत १९७१ साली आविष्कार या नाट्यसंस्थेची स्थापना केली. या नवीन संस्थेचं व्यवस्थापन काकडे काकांनी आपली जबाबदारी म्हणून स्विकारलं आणि पुढे त्यांनी काय मागे वळून पाहिलंच नाही. अविष्कार आणि काकडे काका याचं नातं दृढ होत गेलं. तसंच त्यांचं रंगभूमीशी खास करुन प्रायोगिक रंगभूमीशी असलेलं एक वेगळं नातं देखील कायम होत गेलं.

 

 

काकडे काका आणि अविष्कारसाठी महत्त्वाचा टप्पा ठरला ती छबिलदास चळवळ. या चळवळीने मराठी रंगभूमीला बरेच नवीन चेहरे दिले. या चळवळीतून बऱ्याच नवीन गोष्टी देखील रंगभूमीवर घडताना दिसल्या. काकडे काका या चळवळीतील एक मुख्य चेहरा होते. पडद्यावर दिसणाऱ्या प्रत्येक कलाकाराच्या मागे खंबीरपणे उभे होते काकडे काका. कायम पडद्यामादे राहुन प्रत्येक कलाकृती कशी यशस्वी करावी ह्याचा जणू त्यांना वरदहस्तच लाभला होता. काही वर्षांपूर्वी अविष्कार या त्यांच्या कर्मसंस्थेमध्ये त्यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस खूप आगळ्या-वेगळ्या पद्धतीत साजरा झाला. त्यांच्या पंचाहत्तरी निमित्त अविष्कारकडून त्यावर्षी काकडे काकांनी लागोपाठ १२ महिन्यांत १२ नवीन नाटकं करुन दाखवली आणि या रंगभूमीला १२ नवीन नाटकं मिळाली. हाडाकाडाचा रंगकर्मी असलेले काकडे काका एखाद्या नाट्यकृती सोबत आहेत म्हटल्यावर आपसूकंच त्याबद्दल सगळ्यांनाच चिंता नसायची. तब्बल ७ दशकं या रंगभूमीला वेगवेगळे नवीन प्रयोग आणि नवनवीन कलाकृती देणारं हे रंगभूमीवरचं शांत वादळ आता शमलं आहे. रंगभूमीवरचा ‘अविष्कार’ हरपला आहे... काकडे काकांना आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...