Subodh Bhave Angry: मोबाइल वापरामुळे नाटकात काम करणं थांबवणार सुबोध भावे?

नमन नटवरा
Updated Jul 29, 2019 | 17:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

सुबोध भावेने नुकतीच एकदम कड्डक म्हणत पहिल्यांदाच रंगभूमीवर एन्ट्री घेतली ते अश्रूंची झाले फुले या नाटकातून. पण त्याने आता या पहिल्या नाटकानंतर नाटकात काम करणंच बंद करण्याचा इशारा दिलाय. का ते पाहा.

Subodh Bhave gets angry on audience for phone ringing during play announces to quit acting in theatre
Subodh Bhave Angry: आणि म्हणून नाटकात काम करणं थांबवणार सुबोध भावे?  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • ऐन प्रयोगात फोन वाजल्याने सुबोध भावेने व्यक्त केला तीव्र संताप
  • यापुढे नाटकात काम न करण्याचा दिला इशारा
  • विक्रम गोखले, सुमीत राघवन आणि आता सुबोध भावेला त्रास असह्य

मुबंई: एकदम कड्डकककक... म्हणत सुबोध भावेच्या 'आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर' सिनेमाच्या यशानंतर डॉक्टर घाणेकरांचं अजरामर नाटक 'अश्रूंची झाली फुले' घेऊन सुबोध रंगभूमीवर अवतरला. सिनेमा आणि मालिकांमध्ये अनेक वर्ष काम केलेल्या सुबोधसाठी रंगभूमीवर अवतरण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे त्याच्या या नवीन माध्यामातसुद्धा उत्तम स्वागत केलं गेलं. या नाटकाचा त्याचा प्रत्येक प्रयोग हाऊसफुल सुरु होता. त्याचसोबत लवकरच या नाटकाचा अमेरिकेत दौरा करण्याचं पण जाहीर झालं. पण मग सगळं असं उत्तम सुरु असताना सुबोधने नाटकात काम न करण्याचा निर्णय का घेतला? याला कुठेतरी आपण प्रेक्षक जबाबदार आहोत. 

ऐन प्रयोगात मोबाईल फोन वाजल्याने होणारा त्रास एका कलाकाराला खरंच किती असह्य असतो हे सुबोधच्या नुकत्याच केलेल्या पोस्टवरुन लक्षात येतं. या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘अनेक वेळा सांगून,विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज वाटत नाही. यावर उपाय एकच या पुढे नाटकात काम न करणं. म्हणजे त्यांच्या फोनच्या मध्ये आमची लुडबूड नको.कारण फोन जास्त महत्त्वाचा.नाटक काय टीव्ही वर पण बघता येईल.’

 

 

सुबोधच्या तीव्र संतापानंतर सोशल मीडियावर त्याला पाठिंबा देणारे अनेक कमेन्ट्स येत आहेत. शिवाय त्याने असा निर्णय घेऊ नये असं सुद्धा त्याचे फॅन्स त्याला आवर्जून सांगत आहेत. पण यावर आता पुढे सुबोध काय निर्णय घेतो ते बघावं लागणार आहे. तसंच नाटकात असा फोन वाजल्याने त्रास होणारा सुबोध पहिला कलाकार नाहीए. अनेक कलाकारांनी अनेकदा यावर आवाज उठवला आहे. शिवाय नाटकाची सुरुवात होताना केल्या जाणाऱ्या घोषणेतही आता बदल करत फोन बंद करण्यास किंवा सायलेन्ट करण्यास आवर्जून सांगितलं जातं. पण सगळेच ही घोषणी किंवा ही विनंती मनावर घेतात असं नाही आणि मग असं काहीतरी होऊन बसतं.

 

 

 

अनेक वर्षांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी असाच प्रेक्षकांचा फोन वाजल्याने त्यांच्या एका नाटकाचा प्रयोग मध्येच थांबवला होता. तर हल्लीच अभिनेता सुमीत राघवनने त्याच्या 'नॉक नॉक सेलिब्रिटी' या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी असंच फोन वाजल्याने नाटक थांबवलं होतं. नंतर त्याने प्रयोग पूर्ण केला पण त्याने सुद्धा असाच संताप त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वक्त केला होता. सांगायचं तात्पर्य हेच की हा त्रास गेले अनेक वर्ष कलाकार मंडळी भोगत आहेत. पण तो सुरुच आहे आणि त्यावर तोडगा असा काही निघालेला नाहीये. त्यामुळे एकतर प्रेक्षकवर्गाने सुजाण होणं गरजेचं आहे किंवा मग यावर काहीतरी सुवर्णमध्ये काढणं खरंच गरजेचं आहे हे निश्चित.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी