ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन

नमन नटवरा
रोहित गोळे
Updated May 18, 2020 | 08:53 IST

ज्येष्ठ साहित्यिक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते रत्नाकर मतकरी यांचं कोरोना निधन झालं. मुंबईतील सेवन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

veteran writer ratnakar matkari dies due to corona
ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन
  • मुंबईतील सेव्हन हिल्समध्ये घेतला अखेरचा श्वास
  • मतकरींच्या निधनामुळे नाट्यक्षेत्रावर शोककळा

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं काल मध्यरात्री निधन झालं. मुंबईतील सेवन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक बाब म्हणजे मतकरी यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं समजतं आहे. मृत्यू त्यांचं वय ८१ होतं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मतकरी यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, मुलगी सुप्रिया, मुलगा गणेश, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी मतकरी यांना सतत थकवा जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच वेळी त्यांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली होती. यावेळी चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.  त्यामुळे त्यांच्यावर त्या स्वरुपाचे उपचार सुरु होते. मात्र, काल रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचं वय ८१ होतं. 

गूढ कथेचा बादशहा अशी ओळख असलेल्या रत्नाकर मतकरी यांनी आतापर्यंत प्रचंड लेखन केलं आहे. त्यांची अनेक नाटकं आजवर गाजली आहेत. वयाच्या सतराव्या वर्षापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली होती. 'वेडी माणसं' या एकांकिकेद्वारे त्यांनी नाट्यक्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. तेव्हापासून आजवर त्यांनी प्रचंड लेखन केलं. 

अलिकडेच आलेल्या अलबत्या गलबत्या, निम्मा शिम्मा राक्षस ही आलेली नाटकं देखील प्रचंड गाजली. या दोन्ही नाटकांचं लेखन मतकरींनी केलं होतं. गूढ कथा यामध्ये मतकरींचा हातखंडा होता.  ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा,  आरण्यक  यासारखी मतकरींची अनेक नाटकं प्रचंड गाजली आहेत. 

नाट्य लेखनाशिवाय मतकरींची अनेक पुस्तकं देखील गाजली आहेत. आतापर्यंत त्याचे वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या आणि अनेक लेख संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय 'माझे रंगप्रयोग' हा त्यांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथ देखील काही वर्षापूर्वी प्रकाशित झाला होता. नाटक, साहित्य क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या मतकरी यांनी काही टीव्ही मालिका आणि चित्रपटासाठी देखील लेखन केलं होतं. त्यांच्या 'इन्व्हेस्टमेंट' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील पटकावला होता. 

रत्नाकर मतकरी यांनी आजवर अनेक पुरस्कार पटकावले आहेत. संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी या दोन्ही मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी