Dagdi Chaal 2: तब्बल चार वर्षांनी दगडी चाळीत अवतरले ‘डॅडी’

मराठी पिक्चर बारी
Updated Oct 09, 2019 | 17:01 IST | चित्राली चोगले

मराठीतला सुपरस्टार अंकुश चौधरी, पूजा सावंत आणि मकरंद देशपांडे यांचा २०१५ साली आलेला दगडी चाळ सिनेमा बराच गाजला. तब्बल चार वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल घोषित झाला आहे आणि त्यानिमित्त दगडी चाळीत डॅडींची झलक दिसली

a sequel to 2015 marathi film dagdi chaal dagdi chaal 2 announced after makarand deshpande visits dagdi chaal in mumbai
Dagdi Chaal 2: दगडी चाल २च्या निमित्ताने तब्बल चार वर्षांनी दगडी चाळीत अवतरले ‘डॅडी’  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • तब्बल चार वर्षांनी दगडी चाळीत दिसली डॅडींची झलक
  • २०१५च्या दगडी चाळ सिनेमाचा सिक्वेल दगडी चाळ २ची घोषणा
  • सिनेमाची घोषणा करण्यासाठी अभिनेता मकरंद देशपांडे डॅडींच्या वेशात दगडी चाळीत अवतरले

मुंबई: चुकीला माफी नाही... हा डायलॉग ऐकताच मोठ्या पडद्यावर साकारलेला दगडी चाळ आणि तो माहोल आपसूकच आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. २०१५ साली रिलीज झालेल्या दगडी चाळ सिनेमाचा हा डायलॉग तर हिट झालाच तसंच सिनेमा देखील गाजला. याच सिनेमाची पार्श्वभूमी ठरलेल्या मुबंईतल्या प्रसिद्ध दगडी चाळीत तब्बल चार वर्षानी पुन्हा एकदा काही गोष्टी घडल्या आहेत. नवरात्रीतल्या नवमीला दगडी चाळ परिसरात एक ओळखीचा चेहरा अनपेक्षितपणे फिरताना दिसला. हा चेहरा या दगडी चाळीतलाच अगदी जवळचा असल्याची मग चर्चा रंगली.

अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतल्या दगडी चाळीत तिथल्या रहिवाशांना नवरात्रीमध्ये चक्क त्यांचे 'डॅडी' दिसले. रुबाबदार चाल, प्रचंड काफिला आणि वातावरणात अचानक आलेला एक दरारा हे सर्व पाहून तिथल्या लोकांनी डॅडींना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायला सुरुवात केली. काहींनी हारही घातले आणि बरीच गर्दी देखील जमा झाली. परिसरात डॅडी आले असा आवाज झाला आणि सगळेच तिथे एकत्र आले. पण त्या वेळी काही लोकांनी निरखून पाहिले असता 'डॅडीं'च्या वेशात चक्क मकरंद देशपांडे होते.

मकरंद यांच्याकडे पाहून खुद्द 'डॅडी' असल्याचाच भास सर्वांना झाला. मकरंद देशपांडे यांनी सुद्धा 'डॅडीं'चे व्यक्तिमत्व, वेशभूषा तंतोतंत साकारली होती. २०१५ला दगडी चाळीत डॅडींची भूमिका साकारत मकरंद या चाळीशी जोडले गेले. ते ४ वर्षांनी पुन्हा इथे का आले? असा प्रश्न नंतर उपस्थित झाला. मकरंद देशपांडे दगडी चाळीत जाण्याचे खरं तर खास निमित्त होतं. तिथे जाऊन मकरंद यांनी देवीची आरती करत, २०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या संगीता अहिर मुव्हीज निर्मित दगडी चाळ २ या सिनेमाची अधिकृत घोषणा केली. नवरात्रीचं निमित्त साधत आणि योग्य ठिकाणी या नव्या सिनेमाची घोषणा झाली आहे.

दगडी चाळ २ या सिनेमाची निर्मिती संगीता अहिर आणि क्रिश अहिर यांनी केली असून शूटिंग सुरू झालं आहे. दगडी चाळ २ हा दगडी चाळ सिनेमाचा सिक्वेल असून या सिनेमामध्ये पुन्हा अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांची अधिकच फुलत जाणारी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन पहिल्या भागाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावून नेणारा तरुण दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी केलं आहे. तर या सिनेमाला अमितराजचं संगीत लाभलं आहे. सिनेमा घोषीत होताच बरीच चर्चा रंगणार यात काही वाद नाही. त्यामुळे पुन्हा एकदा तोच दरारा अनुभवण्यासाठी सज्ज होऊयात, कारण चुकीला माफी नाही...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी