‘विकून टाक’ सिनेमातून मराठीमध्ये अभिनेता चंकी पांडेचं पदार्पण, पाहा ट्रेलर

मराठी पिक्चर बारी
Updated Jan 20, 2020 | 18:34 IST | चित्राली चोगले

पोश्टर बॉईज, पोश्टर गर्ल सारखे धमाकेदार सिनेमे दिल्यानंतर दिग्दर्शक समीर पाटील पुन्हा सज्ज झालेत विकून टाकसाठी. विशेष म्हणजे या सिनेमात अभिनेता चंकी पांडे महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. पाहा ट्रेलर.

actor chunky pandey all set to debut in marathi industry through upcoming marathi film vikun taak
‘विकून टाक’ सिनेमातून मराठीमध्ये अभिनेता चंकी पांडेचं पदार्पण, ‘तेझाब’नंतर पुन्हा दिसणार अरबच्या वेशात 

थोडं पण कामाचं

  • विकून टाक सिनेमातून अभिनेता चंकी पांडेचं मराठीमध्ये पदार्पण
  • तेझाब नंतर ३२ वर्षांनी पुन्हा साकारणार अरबची भूमिका
  • समीर पाटील दिग्दर्शित विकून टाकचा धमाकेदार ट्रेलर अखेर भेटीला

मुंबई: बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे त्याच्या एकापेक्षा एक भूमिकांसाठी फारच प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेल्या या कसदार अभिनेत्याने आता मराठीत पाऊल टाकायचं ठरवंल आहे. लवकरच भेटीला येणाऱ्या विकून टाक या सिनेमातून चंकी मराठीमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात तो पुन्हा एकदा अरबाच्या भूमकेत दिसेल. तब्बल ३२ वर्षांपूर्वी गाजलेल्या तेझाब सिनेमामध्ये लोटल्या पठाणला चकमा देण्यासाठी चंकीने अरबचा वेश परिधान केला होता. चंकीच्या या पहिल्या वहिल्या मराठी सिनेमा विकून टाकचा धमाकेदार ट्रेलर नुकताच भेटीला आला आहे.

मराठी सिनेसृष्टीला 'पोश्टर बॉईज', 'पोश्टर गर्ल' सारखे सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर दिग्दर्शक समीर पाटील विकून टाक या सिनेमाची मेजवानी घेऊन आले आहेत. सिनेमाच्या पोस्टर, टिझरवरुन या सिनेमात सुद्धा काहीतरी धमाकेदार असणार याची कल्पना तर आली आहेच. या सगळ्यामुळे सिनेमाची उत्सुकता बरीच आहे आणि हिच उत्सुकता आता अधिक वाढवण्यासाठी विकून टाकचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे.

पाहा ट्रेलरची झलक-

नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँन्च सोहळा कलाकारांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थित मुंबईत पार पडला. या वेळी खुद्द चंकी पांडे हजर होता आणि सिनेमाबद्दल बोलताना तो म्हणाला, ''अभिनय क्षेत्रात आल्यापासूनच मला मराठीत काम करण्याची इच्छा होती आणि ही इच्छा 'विकून टाक' सारख्या चित्रपटाद्वारे पूर्ण झाली. या चित्रपटाला होकार देण्याची काही कारणे आहेत, दर्जेदार, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती करणारा तरुण निर्माता उत्तुंग हितेंद्र ठाकूर, सामान्य विषय हाताळून असामान्य चित्रपट बनवणारे दिग्दर्शक समीर पाटील आणि 'विकून टाक'ची कथा. इतक्या जमेच्या बाजू असताना नाही म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राहिला प्रश्न माझ्या भाषेचा. तर त्यातही काही अडचण आली नाही कारण इतकी वर्षं मी मुंबईत राहत असल्याने मराठीशी माझी नाळ जुळली आहे. मराठी भाषेच्या विनोदबुद्धीची अन्य भाषांशी तुलनाच होऊ शकत नाही. विकून टाक हा हसतहसत प्रेक्षकांना नकळत विचार करायला लावणारा चित्रपट आहे आणि हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.''

ट्रेलरवरून हा सिनेमा सुद्धा ग्रामीण भागात घडत असून या गावातील हॅण्डसम मुलगा 'मुकुंद तोरांबे' याच्या अवतीभवती फिरणारी आहे असं लक्षात येतं. सर्वसामान्य आयुष्य जगत असतानाच त्याच्या आयुष्यात काही घटना घडताना दिसत आहेत, त्यातच अधिक भर म्हणून त्याच्या आयुष्यात एक अनपेक्षित पाहुणाही आलेला दिसतोय. हा दुबईहून आलेला पाहुणा मुकुंदला का शोधतोय? मुकुंद आणि त्या अरब शेखचे काय कनेक्शन? आणि या सगळयात गावकऱ्यांच्या मनात उपस्थित झालेल्या शंका, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मात्र ३१ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागेल. विवा इनएन प्रॉडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित विकून टाक सिनेमामध्ये शिवराज वायचळ, चंकी पांडे, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी