जितेंद्र जोशी करतोय चोरी, पण का? जाणून घ्या 'चोरीचा मामला'च्या या धमाल टीझरमधून

मराठी पिक्चर बारी
Updated Dec 20, 2019 | 18:42 IST | चित्राली चोगले

सध्या एका सिनेमाच्या नावाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तो सिनेमा म्हणजे चोरीचा मामला. या सिनेमाचा पहिला-वहिला टीझर नुकताच भेटीला आला असून या धमाल टीझरमधून सिनेमा धमाल असणार याचा सहज अंदाज बांधता येतो.

actor director priyadarshan jadhav is ready to give a laughter dose with his upcoming marathi directorial choricha maamla check the first hilarious teaser now
जितेंद्र जोशी करतोय चोरी, पण का? ते जाणून घ्या 'चोरीचा मामला'च्या या धमाल टीझरमधून 

थोडं पण कामाचं

  • 'चोरिचा मामाला' सिनेमाचा धमाल टीझर भेटीला
  • जितेंद्र जोशीच्या नंदनची हटके चोरी पाहुन हसू आवरणार नाही
  • प्रियदर्शन जाधन दिग्दर्शित हा सिनेमा येत्या ३१ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: ‘चोरिचा मामला…’ म्हंटलं की आपल्याला मराठीतलं गाजलेलं धमाल गाणं आठवल्या शिवाय राहत नाही पण आता याच्याशी अजून एक धमाल गोष्ट जोडली जाणार आहे आणि ती आहे एक नवा कोरा मराठी सिनेमा. सध्या सोशल मीडियात या नावाची आणि सिनेमाची बरीच चर्चा आहे. चोरिचा मामला असं आगळं वेगळं नाव आणि त्यात प्रियदर्शन जाधवचं दिग्दर्शन यामुळे सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता सध्या निर्माण झालेली दिसते. त्यात सिनेमाला लाभली आहे मल्टीस्टारकास्ट. त्यामुळे सिनेमाची चर्चा अगदी जोरदार सुरु आहे. त्यातच सिनेमाची हटके पोस्टर्स रिलीज झाली आणि लगेच भेटीला आला सिनेमाचा पहिला वहिला टीझर. या टीझरमध्ये दिसला अभिनेता जितेंद्र जोशी एका अतरंगी भूमिकेत.

चोरिचा मामला सिनेमाचा पहिला टीझर खास जितूवर केंद्रीत आहे. सर्वात आधी जितूच्या लूकचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलं आणि आता जितूचा हा नवीन टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. यामुळे सिनेमातील जितूच्या भूमिकेचा थोडक्यात अंदाज घेता येतो. या टीझरमध्ये जितूची धमाल बाजू दिसून येते. यात तो चोरी करताना दिसतो. अगदी चप्पल ते पैसे असा जितूचा चोरिचा मामला या टीझरमध्ये अधोरेखीत होताना दिसतो. सगळी चोरी पण एकदम धमाल आणि हटके पद्धतीत करताना तो आपल्याला पहायला मिळतो आणि आपसूकंच हसू फुटल्याशिवाय राहत नाही.

सिनेमात जितूने साकारलेल्या या धमाल भूमिकेचं नाव आहे नंदन. जितूचा हा नंदन चोरिचा मामलामध्ये अजून काय धमाल करतो आणि नेमकी चोरी तो का करत आहे याबद्दल लवकरच अधिक खुलासा होईल. या सिनेमात जितूसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेंमध्ये दिसतील. या सर्वांचे लूक टप्प्याटप्प्याने समोर येणार आहेत. तसेच त्यांच्या भूमिकांचे टीझरसुद्धा अशीच धमाल करायला लवकरच भेटीला येणार आहेत.

"मस्का" या सिनेमानंतर प्रियदर्शन जाधवचा दिग्दर्शक म्हणून चोरीचा मामला हा दुसरा सिनेमा आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओजच्या सहकार्याने सुधाकर ओमळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, स्मिता ओमळे यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. प्रियदर्शननंच सिनेमाचं लेखन तर चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. मस्का सिनेमातून प्रियदर्शननं त्याच्या दिग्दर्शनाची छाप पाडली होती. आता चोरीचा मामला काय कमाल करतो ते कळेलंच लवकर. चोरिचा मामला हा सिनेमा येत्या ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी