Girlz New Song: दोन हिट गाण्यांनंतर ‘गर्ल्स' म्हणतायेत ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी...’

मराठी पिक्चर बारी
Updated Nov 21, 2019 | 23:12 IST | चित्राली चोगले

गर्ल्स सिनेमा लवकरच भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि रिलीज झालेली दोन गाणी एकदम धमाल करत आहेत. यानंतर आता सिनेमाचं तिसरं गाणं 'छबिदार छबी मी तोऱ्यात उभी...' हे भेटीला आलं आहे. पाहा हे गाणं.

after 2 superhit songs from girlz movie the third one chabidar chabi makes an entry
Girlz New Song: दोन हिट गाण्यांनंतर ‘गर्ल्स' म्हणतायेत ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी...’ 

थोडं पण कामाचं

  • 'गर्ल्स' सिनेमाचं तिसरं गाणं 'छबिदार छबी मी तोऱ्यात उभी...' भेटीला
  • दोन गाणी आणि ट्रेलरनंतर या नवीन गाण्याचा धुमाकूळ
  • 'गर्ल्स' सिनेमा येत्या २९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज

मुंबई: बॉईजला टक्कर द्यायला गर्ल्स सज्ज झाल्या आहेत. मुलींच्या भावविश्वात डोकावणारा गर्ल्स या सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता असताना सिनेमाची गाणी आणि ट्रेलर भेटीला आला. ट्रेलरला तर उत्तम प्रतिसाद सर्वत्र मिळताना दिसला. त्याचा परिणाम दिसून आला आणि रिलीजपूर्वीच गर्ल्स सिनेमाचा ट्रेलर हिट ठरला. या सिनेमाचा ट्रेलर यूट्यूबवर ट्रेण्डिंगमध्ये असतानाच या सिनेमाची गाणी सुद्धा जबरदस्त गाजताना दिसत आहेत. आतापर्यंत गर्ल्स सिनेमाची दोन गाणी रिलीज झाली असून या गाण्यांना प्रेक्षकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यानंतर सिनेमाचं तिसरं गाणं भेटीला आलं आहे आणि या तीन गर्ल्स म्हणत आहेत 'छबीदार छबी मी तोऱ्यात उभी...'

नुकतंच रिलीज झालेलं हे गाणं आधीच्या दोन गाण्यासारखंच एकदम नव्या जमान्याचं आहे. 'छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजारोने लाईक्स माझ्या डीपी'ला असे हटके आणि आजच्या मुलींना अगदी सहज कनेक्ट होतील, असे बोल या गाण्याचे आहेत. अगदी अनोख्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने हे गाणे गीतकार जय अत्रे यांनी लिहिलं आहे. तरुणाईला आवडेल असे संगीत प्रफुल्ल-स्वप्नील यांनी दिले आहे. या सिनेमातील हे गाणे जेव्हा पूर्ण झाले तेव्हा सगळ्यांना हे गाणे इतके आवडले, की लगेचच एका झटक्यात सर्वांनी गाण्याला त्यांचा होकार दिला.

 

 

या गाण्याचे बोल कानावर पडताच काहींना वाटेल, की हे जुनंच गाणं शब्दांची तोडफोड करून पुन्हा रिमिक्स केलं आहे. मात्र असे बिल्कुल नाहीये असं सिनेमाची टीम सांगते. ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या 'छबीदार छबी' या गाण्याचे मुख्य शब्द उचलून जय अत्रे यांनी हे गाणे पुन्हा लिहिले आहे. तसेच राम कदम यांच्या श्रवणीय संगीताला प्रफुल-स्वप्नील यांनी आजच्या काळानुरूप बदलून संपूर्ण नवीन गाणे प्रेक्षकांसमोर आणले आहे. जुने 'छबीदार छबी' हे गाणे उषा मंगेशकर यांनी गायले होते तर गर्ल्स सिनेमातलं हे नवीन 'छबीदार छबी' गाणे आदर्श शिंदे आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी गायले आहे.

 

 

हे गाणे बघताना आणखी एक गोष्ट आपलं लक्ष वेधून घेते ती म्हणजे, गाण्यातील कलाकारांची वेशभूषा. गाण्याला साजेशी आणि स्टायलिश अशी वेशभूषा या सिनेमाचे निर्माते नरेन कुमार आणि नृत्यदिग्दर्शक सागर दास यांनी ठरवली आहे. एव्हरेस्ट एन्टरटेनमेंन्ट आणि कायरा कुमार क्रिएशन्स प्रस्तुत, कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित गर्ल्स या सिनेमाचे निर्माता नरेन कुमार असून विशाल देवरुखकर यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. गर्ल्स हा सिनेमा येत्या २९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी