शिवछत्रपतींच्या आयुष्यावर आधारित ३ सिनेमे येणार, अमोल कोल्हेची घोषणा

मराठी पिक्चर बारी
Updated Dec 20, 2019 | 17:04 IST | चित्राली चोगले

नाटक व मालिकांच्या माध्यमातून इतिहासाची पाने उलगडल्यानंतर अभिनेता डॉ. अमोल कोल्हे आता छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र ‘शिवप्रताप’ या ३ सिनेमांच्या मालिकेतून रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झालेत.

after playing chatrapati shivaji maharaj and sambhaji maharaj onscreen actor amol kolhe is all set to bring shivaji maharaj’s life on big screen through 3 marathi movies
शिवरायांचा ‘शिवप्रताप’ रुपेरी पडद्यावर ३ सिनेमामधून साकारण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे सज्ज  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • डॉ. अमोल कोल्हे शिवरायांचं जीवनचरित्र ‘शिवप्रताप’मधून मोठ्या पडद्यावर रेखाटणार
  • ‘वाघनखं’, ‘वचपा’, ‘गरुडझेप’ या तीन सिनेमांची केली घोषणा
  • पहिला सिनेमा ६ नोव्हेंबर २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई: सध्या मराठी इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक सिनेमांची चलती आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अनेक ऐतिहासिक सिनेमांची पर्वणी प्रेक्षकांसाठी असताना सुद्धा एखाद्या नवीन ऐतिहासिक कथानकावर आधारित सिनेमा जाहीर होताच प्रेक्षकांमध्ये आपोआपच कुतूहल निर्माण होत असते. याच ऐतिहासिक सिनेमांच्या यादीत आता अजून तीन सिनेमे जोडले जाणार आहेत. नाटक व मालिकांच्या माध्यमातून इतिहासाची पाने उलगडल्यानंतर अभिनेता खासदार डॉ. अमोल कोल्हे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील तेजोमय घटनांचे महान पर्व ‘शिवप्रताप’ या तीन सिनेमांच्या मालिकेतून रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाले आहेत.

अमोल यांनी आपल्या ‘जगदंब क्रिएशन्स’ या संस्थेतर्फे ‘वाघनखं’, ‘वचपा’, ‘गरुडझेप’ या तीन सिनेमांची घोषणा नुकतीच केली. रुपेरी पडद्यावर यानिमित्ताने शिवशाही एका अनोख्या पद्धतीत अनुभवायला मिळणार आहे हे निश्चित. खुद्द डॉ. अमोल कोल्हे तर त्यांच्यासोबत डॉ. घनश्याम राव, विलास सावंत या सिनेमांचे निर्माते असतील. ही बातमी सिनेरसिकांसाठी एकदम खास ठरली आहे हे नक्की.

 

 

हे तीन सिनेमे अमोल यांनी फक्त जाहीर केले असं नाही तर त्यासोबत यातील पहिलं पानं कधी भेटीला येणार त्याची तारीखसुद्धा जाहीर केली आहे. यातील ‘वाघनखं’ हा पहिला सिनेमा ६ नोव्हेंबर २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्तिक केंढे हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून लेखन प्रताप गंगावणे यांचे आहे. येत्या जानेवारीपासून या सिनेमाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. खुद्द अमोल या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बुद्धीच्या आणि शौर्याच्या जोरावर अफझलखानाचा वध कसा केला? हे ‘वाघनखं’ सिनेमातून रेखाटलं जाणार आहे. अफझलखानाच्या वधानंतर महाराजांच्या बंदोबस्तासाठी औरंगजेबाने पाठवलेल्या शाहिस्ताखानाला पळवून लावल्यानंतर रयतेची झालेली नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी सुरतेची मोहीम आखली. आणि शाहिस्ताखानाने केलेल्या नुकसानीचा ‘वचपा’ काढला. हा वचपा महाराजांच्या राजनीतीशास्त्राचा अद्भुत चमत्कार होता. महाराजांच्या अनोख्या राजनीतीचा हा पैलू ‘वचपा’ सिनेमातून पाहता येणार आहे. राजकीयदृष्ट्या आग्र्याहून सुटका ही हिंदुस्थानच्या इतिहासातील अद्वितीय गरुडझेप होती. ही गरुडझेप घेतानाचे महाराजांचे राजकीय डावपेच, बुद्धिचातुर्य आणि दूरदृष्टी याची झलक ‘गरुडझेप’ सिनेमातून पहायला मिळणार आहे. शिवरायांचे हे प्रेरणादायी जीवनकार्य देशभरात आणि देशाबाहेर पोहचविण्याच्या उद्देशाने या तीनही सिनेमांची निर्मिती मराठीसोबत हिंदी भाषेतही होणार आहे.

 

 

याबद्दल अधिक माहिती देत अमोल कोल्हे म्हणाले की, “इतिहास हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. लोकोत्तर नेतृत्व नकळत अनेक जीवनमूल्ये देऊन जातात. ‘शिवप्रताप’ चित्रपटांच्या माध्यमातून आम्ही हे प्रेक्षकांसाठी आणणार आहोत. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर आणखी तीन चित्रपटांची घोषणा करण्यात येणार आहे. आजच्या तरूणांपुढे एक आदर्श उभा करण्याचं आणि त्यांना दिशा दाखवण्याचं काम या चित्रपटाच्या निमित्ताने होईल. त्यामुळे या चित्रपटांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.”

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी