AB aani CD Teaser: ‘मी आलोय चंदू...’ म्हणत ‘एबी आणि सीडी’ या मराठी सिनेमात घुमला अमिताभ बच्चन यांचा आवाज

मराठी पिक्चर बारी
Updated Feb 24, 2020 | 16:32 IST | चित्राली चोगले

एबी आणि सीडी सिनेमा मध्यंतरी जाहीर झाला ज्यामध्ये बिग बी अमिताभ झळकणार असं समजलं आणि सिनेमाची उत्सुकता भलतीच वाढली. आता या सिनेमाचा टीझर भेटीला आला आहे आणि त्यामध्ये शेवटी ऐकू येतो तो बिग बींचा एक डायलॉग.

amitabh bachchan’s first full-fledged marathi movie ab aani cd ‘s teaser is out
AB aani CD Teaser: ‘मी आलोय चंदू...’ म्हणत ‘एबी आणि सीडी’ या मराठी सिनेमात घुमला अमिताभ बच्चन यांचा आवाज 

थोडं पण कामाचं

  • ‘एबी आणि सीडी’ सिनेमाचा टीझर भेटीला
  • बिग बी अमिताभ दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
  • सिनेमा येत्या १३ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: काही महिन्यांपूर्वी एक सिनेमा मराठीमध्ये जाहीर झाला आणि त्याचं मुख्य आकर्षण ठरलं सिनेमात झळकणारे महानायक बिग बी अमिताभ बच्चन. तब्बल २५ वर्षांनंतर बिग बी मराठी सिनेमात झळकणार आणि ते पण एखाद्या गाण्यापूरता नव्हे तर एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी, त्यामुळे सिनेमाबद्दल बरंच कुतूहल होतं. सिनेमाचं टायटल होतं एबी आणि सीडी आणि या मधली ‘एबी’ ही अक्षरं खुद्द बिग बींसाठी होती. एबी असं त्यांना प्रेमाने संबोधलं जातं आणि तेच सिनेमात चोखपणे वापरण्यात आलं आहे तर या टायटलचा दुसरा भाग सीडी म्हणजे चंद्रकांत देशपांडे म्हणून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले झळकतील. या बहुचर्चीत आणि बहुप्रतीक्षीत सिनेमाचा टीझर अखेर भेटीला आला आहे.

 

टीझरमधून समोर येते ती सिनेमाची कथा. गेले अनेक दिवस वाटत होतं की सिनेमात बिग बी कसे बरे पेरले जाणार. आता ते उघड झालं आहे. सिनेमात सीडी म्हणजे चंद्रकांत देशपांडेंचे वर्ग मित्र म्हणून बिग बी दिसणार आहेत. म्हणजे जरा विचार करा आणि कल्पना करा की तुमच्या आजोबांचे वर्ग मित्र बिग बी असते तर? काय वेगळंच कुतूहल असतं नाही? म्हणजे अनेकांना प्रश्न पडले असते किंवा सतत त्यांच्या अवती भवती माणसं असती, वगैरे-वगैरे... असंच काहीसं घडलंय एबी आणि सीडी या सिनेमातील चंद्रकांत देशपांडे यांच्या बाबतीत.

 

 

 

 

आजी-आजोबा आणि नातवंड यांच्यामधील नातं हे फारच हलकंफुलकं असतं. आपल्या हक्काची आणि तितकीच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत समजून घेणा-या व्यक्ती म्हणजे आजी-आजोबा असं प्रत्येक नातवाला वाटत असतं आणि ते तितकंच खरंही असतं. जसजसं म्हातारपण येतं तसतसं घरातल्यांना म्हातारे व्यक्ती ही अडचण वाटू लागते किंवा त्यांच्याकडे फार लक्ष द्यावसं नाही वाटत आणि याचवेळी त्यांचा खंबीर आधार बनतात त्यांची नातवंड. अशीच विक्रम गोखले, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश यांची आजोबा-नातवंडांची जोडी एबी आणि सीडी मध्ये पाहायला मिळणार आहे. सिनेमाचा टीझर खुद्द बिग बी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन देखील शेअर केला आहे आणि लिहिलं आहे, 'बऱ्याच जुन्या माझ्या सहकाऱ्यासोबत एक मराठी सिनेमा केला आहे...'

 

 

 

 या सिनेमाचा टीझरमध्ये अधोरेखील होतं ते आजोबांना अमिताभजींकडून आलेलं पत्रं, तसेच त्यांच्याकडून सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलेला होकार, पण नंतर चंद्रकांत देशपांडे यांनी स्वत: ‘आज अमिताभ बच्चन सोहळ्याला येणार नाही’ हे केलेले वक्तव्य आणि बिग बींच्या दमदार आवाजातील ‘चंदू मी आलोय’ हा डायलॉग’. या सर्व गोष्टी प्रेक्षकांची सिनेमाप्रती उत्सुकता वाढवणार यात बिलकुल शंका नाही. अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित आणि पीव्हीआर प्रदर्शित आणि मिलिंद लेले दिग्दर्शित एबी आणि सीडी मध्ये अमिताभ बच्चन, विक्रम गोखले यांच्यासह सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. टीझर बघून खरंच उत्कंठा ताणली गेली आहे की, येतील का बिग बी उर्फ एबी सोहळ्याला? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मात्र १३ मार्च २०२०ची वाट पहावी लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी