Andhaarachi Gaadi Song:‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’मधील ‘अंधाराची गाडी’ गाणं भेटीला

मराठी पिक्चर बारी
Updated Nov 12, 2019 | 17:27 IST | चित्राली चोगले

सई ताम्हणकर आणि राजेश शृंगारपुरे ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे, ती कुलकर्णी चौकातला देशपांडे या सिनेमामध्ये. सिनेमाचा ट्रेलर भेटीला आल्यानंतर आता सिनेमातलं अंधाराची गाडी हे गाणं रिलीज झालं आहे.

andhaarachi gaadi new song from saie tamhankar starrer kulkarni chaukatla deshpande is out now
Andhaarachi Gaadi Song: सई ताम्हणकरवर चित्रित ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’मधील ‘अंधाराची गाडी’ गाणं भेटीला 

थोडं पण कामाचं

  • ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’मधील ‘अंधाराची गाडी’ गाणं भेटीला
  • सई ताम्हणकरवर चित्रीत गाणं झालं रिलीज
  • ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ सिनेमा येत्या २२ नोव्हेंबर रोजी रिलीजसाठी सज्ज

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सई ताम्हणकर एका अनोखा पोस्टरवर झळकली. हे पोस्टर होतं कुलकर्णी चौकातला देशपांडे या सिनेमाचं. सिनेमाच्या नावापासून ते सिनेमाच्या पोस्टरची बरीच चर्चा रंगली. सिनेमाचं पोस्टर खूप अनोखं होतं कारण त्यावर सई एका वेगळ्या लूकमध्ये दिसत होती त्याचसोबत पोस्टरवर बरेच शब्द लिहिलेले होते. हे शब्द म्हणजे सिनेमातील सई साकारणार असलेल्या विविध भूमिका होत्या. या भूमिका ती एकाच पात्रामधून साकारणार आहे हे समोर आलं ते या सिनेमाच्या ट्रेलरमधून. सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आणि सिनेमाचा विषय लक्षात आला.

कुलकर्णी चौकातला देशपांडे या सिनेमाच्या ट्रेलर नंतर सिनेमातलं ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हे गाणं रिलीज केलं गेलं. यानंतर आता सिनेमाचं अजूनन एक खूप महत्त्वाचं गाणं भेटीला आलं आहे. ‘सुंदरा’ हे गाणं थोडं फ्रेश होतं तिथेच नुकतंच रिलीज झालेलं ‘अंधाराची गाडी’ हे गाणं थोडं सॅड नोटवर जाणारं आहे. ‘अंधाराची गाडी’ हे गाणं सई ताम्हणकरवर चित्रित केलेलं असून गाण्यात बऱ्याच घडामोडी घडताना दिसतात. 

 

 

गाण्यात सिनेमातील गहन परिस्थिती लक्षात येते आणि गाण्यातून ती उत्तम मांडली सुद्धा गेली आहे. गाण्याचे बोल प्रत्येक परिस्थिती अधोरेखित करताना दिसतात. ‘कोठुनी कोठे पोचले मी, कोठे माझी वारी... अंधाराची गाडी...’ या नोटवर सुरू होणारा गाणं थोडं गहन असलं तरी ऐकायला नक्कीच श्रवणीय आहे. गाण्याला गायिका सायली खरेचे सूर लाभले आहेत. तसंच गाण्याचं संगीत आणि शब्द सुद्धा खुद्द सायलीचेच आहेत.

 

 

लग्न होऊन विभक्त झालेली स्त्री आणि त्यानंतर पुन्हा प्रेमात पडताना तिच्या समोर येणारी विविध आव्हानं, यावर कुलकर्णी चौकातला देशपांडे सिनेमा बेतलेला आहे. सिनेमात सईचं पात्र नवऱ्यापासून वेगळं झालेलं असून तिला एक लहान मुलगा असल्याचं दाखवण्यात आलं आहे. दुसऱ्या लग्नाचा विचार करताना या मुलाची मनस्थिती आणि सईच्या मनाची घालमेल हे आणि अनेक विषय सिनेमात दिसणार आहेत. सिनेमात सई ताम्हणकर सोबत राजेश शृंगारपुरे पहिल्यांदाच दिसून येणार आहे. तसंच अभिनेता निखिल रत्नपारखी याची सुद्धा सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे. सिनेमात एका महत्त्वाच्या भूमिकेत जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी सुद्धा दिसणार आहेत. या व्यतिरिक्त सिनेमात बऱ्याच कसलेल्या कलाकारांची फौज पहायला मिळणार आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित कुलकर्णी चौकातला देशपांडे सिनेमाची निर्मिती स्मिता गानु यांची आहे तर सह-निर्मिती अजित माधराव पोतदार आणि सीमा निरंजन अल्पे यांची आहे. हा सिनेमा येत्या 22 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर तुमच्या जवळच्या सिनेमागृहात भेटीला येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी