Triple Seat Teaser: अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे स्टारर्र ट्रिपल सीट सिनेमाचा धमाल टीझर भेटीला

मराठी पिक्चर बारी
Updated Sep 20, 2019 | 17:01 IST | चित्राली चोगले

अंकुश चौधरीचा डबल सीट सिनेमा प्रचंड गालजा आता लवकरच तो ट्रिपल सीट घेऊन भेटीला येतोय. या दोन्ही सिनेमांमध्ये नाव व अंकुश सोडलं तर तसं काही साम्य नाही. ट्रिपल सीट एकंदरीत नवीन विषयाचा सिनेमा असून त्याचा टीझर आलाय

ankush chaudhari shivani surve starrer marathi movie triple seat teaser is out
Triple Seat Teaser: अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे स्टारर्र ट्रिपल सीट सिनेमाचा धमाल टीझर भेटीला 

थोडं पण कामाचं

  • अंकुश चौधरीच्या आगामी सिनेमा 'ट्रिपल सीट'ची भन्नाट झलक
  • ट्रिपल सीट सिनेमाचा धमाल टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
  • सिनेमात अंकुश, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटीलच्या प्रेमाचा त्रिकोण रंगणार

मुंबई: मराठीतला सुपर स्टार अंकुश चौधरीचा ट्रिपल सीट हा सिनेमा मध्यंतरी घोषीत झाला आणि एकच चर्चा रंगली. अनेकांनी हा त्याच्या गाजलेल्या डबल सीट सिनेमाचा सिक्वेल असल्याचा अंदाज वर्तवला. पण अंकुशचा हा नवीन सिनेमा डबल सीटचा सिक्वेल नसून संपूर्णपणे एक नवीन सिनेमा आहे. या सिनेमाचं पोस्टर मध्यंतरी रिलीज केलं गेलं आणि सिनेमाची उत्सुकता वाढली. हिच उत्सुकता ताणून धरण्यासाठी सिनेमाच्या मेकर्सने सिनेमाचा टीझर भेटीला आणला आहे. हा धमाल टीझर सिनेमाच्या कथेचा अंदाज देतो आणि सिनेमातील तीन मुख्य पात्रांची ओळख होते. सध्या हा टीझर सोशल मीडियावर बराच गाजत आहे.

टीझरची सुरुवात होते हात जोडलेल्या अंकुश चौधरी पासून. अंकुश हात जोडत मी कृष्णा सुर्वे अशी स्वतःची ओळख करून देत, आपण आयुष्याच्या प्रवासातील एक प्रवासी असून आपली स्टेअरिंग वरच्याच्या हातात असल्याचे सांगतो. शिवाय, हे सांगताना तो चोरून कुणाच्या तरी घरात शिरून काही तरी शोधत असल्याचे दिसतं. यात तो एक गाडीचा चालक असून सतत अनेक प्रवाश्यांना घेऊन प्रवास करताना दिसतो आणि मग मध्येच टीझरमध्ये दिसते एका अंधाऱ्या खोलीत बसलेली एक तरुणी. ती कृष्णाला कॉल करून मदत करण्याची विनंती करतेय. ही तरुणी म्हणजे बिग बॉस फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे. पावसाच्या प्रत्येक थेंबाला स्वतःचं एक गाणं असतं असं म्हणत शिवानी टीझरमध्ये रिव्हील होते. ते गाणं ऐकत पावसात चिंब भिजताना आपल्याला शिवानी दिसते. शिवाय फोनवर ती अंकुश बरोबर गप्पा मारताना खळखळून हसताना देखील दिसते. यांच्या या वायरलेस प्रेमाची गोष्ट सुरु होते आणि येतो एक ट्विस्ट.

मध्येच टीझरमध्ये अभिनेत्री पल्लवी पाटील अंकुशाचा हात पकडताना दिसते आणि या स्टोरीची तिसरी बाजू उघड होते. या प्रेमाचा त्रिकोण घेऊन येणारी ही ट्रिपल सीट गोष्ट नेमके काय ट्विस्ट आणि टर्न आणणार यासाठी तर सिनेमा पाहावा लागणार आहे. सिनेमाच्या या भन्नाट टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचणार हे नक्की. येत्या दिवळीपर्यंत मात्र प्रेक्षकांना वाट पहावी लागणार आहे कारण येत्या २४ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी दाखल होणार आहे.

संकेत पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ सिनेमाची निर्मिती अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी यांची आहे. नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांची निर्मिती असलेल्या ‘ट्रिपल सीट’ या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित अरविंद दळवी याचे असून सहनिर्माता स्वप्नील संजय मुनोत आणि सहाय्यक निर्माता अॅड. पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत. सिनेमाला अविनाश – विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले आहे, तर गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांची गीते आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी