Khari Biscuit Song: ‘तुला जपणार आहे...’ खारी-बिस्कीट या भावंडांच्या जोडगोळीचं हळवं गाणं भेटीला

मराठी पिक्चर बारी
Updated Oct 16, 2019 | 01:36 IST | चित्राली चोगले

खारी बिस्कीट सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचं पहिलं गाणं फार गाजलं, त्यानंतर आता सिनेमातलं एक भावनिक गाणं ‘तुला जपणार आहे’ रिलीज केलं गेलं आहे. या हळव्या गाण्याची झलक नक्की पाहा.

check out the emotional song from upcoming marathi film khari biscuit
Khari Biscuit Song: ‘तुला जपणार आहे...’ खारी-बिस्कीट या भावंडांच्या जोडगोळीचं हळवं गाणं भेटीला  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • खारी बिस्कीट सिनेमातल नवीन गाणं भेटीला
  • 'तुला जपणार आहे...' हे हळवं गाणं खारी बिस्कीटच्या नात्यावर चित्रीत
  • गाण्याला लाभले आदर्श शिंदे आणि रोंकिनी गुप्ताचे स्वर

मुंबई: खारी आणि बिस्कीट या चिमुरड्या भावंडांच्या जोडगोळीचा खारी बिस्कीट सिनेमा लवकरच भेटीला येणार आहे. सिनेमाच्या नावाबद्दल फार कुतूहल निर्माण झालं होतं. नेमका या नावाचा अर्थ कळत नव्हता पण सिनेमाची झलक दिसताच सिनेमाबद्दल बरीच चर्चा रंगली. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आणि खारी आणि बिस्कीटची ओळख सुद्धा प्रेक्षकांना झाली. आता सिनेमाचं एक हळवं गाणं रिलीज केलं गेलं आहे. 'तुला जपणार आहे...' असे या गाण्याचे बोल असून गाणं नक्कीच भावूक करुन जातं.

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी व्यक्ती असतेच जिला आपण कायम जपू पाहतो. तिची कायम काळजी घेतो आणि तिच्याबद्दल कायम आपण फार प्रेम व्यक्त करत असतो. कोणासाठी ती प्रेयसी असते, तर कोणासाठी प्रियकर, कोणाला आपल्या बायकोबद्दल या भावना असतात तर कोणाला आपल्या नवऱ्याबद्दल. कोणाला आई, कोणाला वडील, कोणाला भाऊ तर कोणाला बहिण, असं होत प्रत्येकाच्या आयुष्यात ‘तुला जपणार आहे…’ असं म्हणणारं एकतरी नातं असतंच. खारी बिस्कीट सिनेमाचं हे नवीन गाणं त्या प्रत्येक नात्यासाठी आहे. या गाण्याचे बोल आणि सूर अगदी मनाला भावतात. तसंच सिनेमातल्या भाऊ-बहिणीच्या जोडीवर चित्रीत हे गाणं एकदम फिट बसतं. आदर्श शिंदे आणि रोंकिनी गुप्ता द्वारे गायलेल्या या गाण्याला अमितराजने संगीतबद्ध केलं आहे.

खारी बिस्कीटची राजकुमारी आहे. खारीसाठी बिस्कीट आणि बिस्कीटसाठी खारी म्हणजे जीव की प्राण. अवघ्या पाच वर्षांच्या गोंडस खारीची इच्छा म्हणजे आठ वर्षांच्या बिनधास्त बिस्कीटसाठी राजकुमारीचा हुकूम. खारी हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नसली तरी ती स्वप्नं बेमालूमपणे पाहते. तिनं असंच एक स्वप्न पाहिलंय वर्ल्ड कपला जाण्याचं. नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये सिनेमाच्या कथेचा अंदाज आला आणि त्यातून हे स्पष्ट झालं. खारीची अनेक स्वप्न बिस्कीटने सहज पूर्ण केली आहेत पण हे स्वप्न मात्र तितकं सोप्प नाही आहे. त्यामुळे बिस्कीट तिचं हे स्वप्न पूर्ण करु शकेल का? या प्रश्नाच्या अवती-भवती हा गोंडस सिनेमा खारी बिस्कीट रेखाटला गेला आहे.

 

सिनेमात बिस्कीटची भूमिका आदर्श कदमने साकारली आहे तर खारी साकारली आहे वेदश्री खाडिलकर हिने. याशिवाय सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते या बच्चेकंपनी सोबत नंदिता पाटकर, सुयश झुंझुरके आणि संजय नार्वेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. संजय जाधव दिग्दर्शित हा सिनेमा येत्या १ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी