Triple Seat Trailer: एक मिस कॉल, प्रेमाचा त्रिकोण आणि बरंच काही, पाहा ट्रिपल सीट सिनेमाचा ट्रेलर

मराठी पिक्चर बारी
Updated Oct 15, 2019 | 15:01 IST | चित्राली चोगले

अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे-पल्लवी पाटील यांच्या यांच्या मिस कॉलवाल्या मैत्रीचं रहस्य उलगडणारा ट्रिपल सीट सिनेमा लवकरच भेटीला येतोय. सिनेमाच्या धमाल टीझरनंतर आता सिनेमचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

check out the entertaining trailer of upcoming marathi movie triple seat
Tripple Seat Trailer: एक मिस कॉल, प्रेमाचा त्रिकोण आणि बरंच काही, पाहा ट्रिपल सीट सिनेमाचा ट्रेलर 

थोडं पण कामाचं

  • अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे-पल्ल्वी पाटील यांच्या ट्रिपल सीट सिनेमाचा ट्रेलर भेटीला
  • ट्रिपल सीट- एक मिसकॉल आणि गुंतत जाणारा प्रेमाचा त्रिकोण
  • सिनेमा येत्या २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज

मुंबई: एक मिस कॉल आणि त्यापुढे घडणारा धमाल सिनेमा म्हणजे ट्रिपल सीट. मध्यंतरी सिनेमाचं पोस्टर भेटीला आलं आणि काही दिवसांनी सिनेमाची झलक दिसली ते सिनेमाच्या टीझरमधून. पहिल्याच पोस्टरमध्ये सिनेमाची कास्ट समजली आणि सिनेमाची बरीच चर्चा रंगली. मराठीतला सुपरस्टार अंकुश चौधरी बऱ्याच दिवसांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे आणि त्यात त्याच्या अपोझिट झळकणार आहे बिग बॉस मराठी फेम शिवानी सुर्वे. यांच्या दोघांच्या जोडीला आहे त्यांची ट्रिपल सीट पल्लवी पाटील. अखेर सिनेमाचा ट्रेलर भेटीला आला आहे आणि यातून दिवाळीत उलगडणाऱ्या अंकुश–शिवानी–पल्लवी यांच्या मिसकॉलवाल्या मैत्रीचे रहस्य उलगडणार असं स्पष्ट होत आहे.

ट्रिपल सीट सिनेमाची टॅगलाईनंच खूप आकर्षक आहे आणि थोडक्यात सिनेमाची वन लाईन सांगून जाते. ‘गोष्ट वायरलेस प्रेमाची’ अशी टॅगलाईन असल्याने फर्स्ट लूकपासून चर्चेत असलेल्या हा आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच दिमाखदार सोहळ्यात, हटके अंदाजात लाँच करण्यात आला. ट्रेलरमध्ये कृष्णा म्हणजेच अंकुश चौधरी आपल्या तीन मित्रांसह कुणाच्या तरी घरात डोकावताना दिसतो आहे. तसंच त्याच्या मोबाईलवर शिवानी सुर्वे अर्थात मीराचा मिसकॉल येतो. ती नेमकी कोण आहे हे त्याला माहीत नाही, मात्र त्यांच्यात मिसकॉलवाली मैत्री होते. त्यांच्यातलं नातं हळू-हळू खुलू लागतं असं दिसतं. त्यांच्यात आता मैत्रीपेक्षा कहीतरी अधिक होत आहे का असं वाटत असताना सिनेमाच्या या ट्रेलरमध्ये येतो एक ट्विस्ट.

ट्रेलरमध्ये पल्लवी पाटील म्हणजेच वृंदाची एन्ट्री होते. कृष्णा आणि वृंदा एकमेकांना कधीच सोडून न जाण्याचे वचन देताना दिसतात. त्यांच्यात देखील एक वेगळं नातं आहे हे सुद्धा दिसून येतं. त्यामुळे बरेच प्रश्न नक्कीच निर्माण होतात आणि सिनेमाबद्दल कुतूहल सुद्धा. शिवाय, प्रविण विठ्ठल तरडे इन्स्पेक्टर दिवानेच्या भूमिकेत आहेत. त्यांची व्यक्तीरेखा कृष्णाच्या आयुष्यातील गुंता सोडवतात की वाढवतात हे बघणं सुद्धा औत्सुक्याचे ठरणार आहे. ट्रेलरच्या शेवटी अंकुश एका मुलीच्या हातात अंगठी घालताना दिसतो, हा हात नेमका कुणाचा आहे? हे आणि ट्रेलर बघून पडलेले अजून प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी यंदाच्या दिवाळीपर्यंत मात्र वाट पहावी लागणार आहे.

अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एन्टरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित ट्रिपल सीट हा एका सत्य घटनेवर आधारित सिनेमा असल्याचं नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये उघड झालं आहे. या सिनेमात अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील यांच्यासह प्रविण विठ्ठल तरडे, शिल्पा ठाकरे, राकेश बेदी, विद्याधर जोशी, वैभव मांगले, योगेश शिरसाट, स्वप्नील मुनोत, प्रकाश धोत्रे, अभिजीत झुंजारराव, प्रसाद बेडेकर, पूनम पाटील, शोभा दांडगे, राहुल नेवाळे यांच्या भूमिका आहेत. ‘एका मिसकॉलने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील तर जगातल्या सर्वांनी आपल्या जवळच्या मित्राला मिसकॉल मारावा’ असे सांगणारा संकेत पावसे दिग्दर्शित ट्रिपल सीट हा सिनेमा येत्या २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी