मुंबई : व्यक्ती, कार्यकर्ता आणि राजकीय नेता अशा विविध रुपातील आनंद दिघे यांचा जीवनपट ‘धर्मवीर’ (Dharmaveer) या चित्रपटातून (Movies) प्रेक्षकांसमोर (Audience) लवकरच येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर(Trailer) प्रदर्शित झाला आहे. अंगावर काटे आणणाऱ्या डॉयलॉगसह हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाने जितकी चर्चा अद्याप केली आहे तितक्याच प्रमाणात लोकांच्या मनावर या चित्रपटाचे संवाद राज्य करतील यात शंका नाही.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारलेले, ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.
दरम्यान आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कट्टर शिवसैनिक काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. 'धर्मवीर' या चित्रपटाचा ट्रेलर पाहून तुम्हीही असंच म्हणाल. शिवसेनेचं एक पर्व गाजवणारे आणि ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद दिघे यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं. पुरावे समोर आणून अन्यायाला समूळ नष्ट करण्यासाठीच दिघेंनी कायम प्रयत्न केले. हिंदुत्त्वासाठी प्राण पणाला लावणाऱ्या पण, धर्माच्या राजकारणात चुकीची पावलं न उचलणाऱ्या नेत्यांपैकी दिघे एक. आनंद दिघे यांच्या राजकीय कारकिर्दीत नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या आणि त्या प्रत्येक प्रसंगाला ते कसे सामोरे गेले हे सर्वच या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओक याने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.
प्रसादने साकारलेले आनंद दिघे पाहताना त्यानं या व्यक्तीरेखेसाठी घेतलेली मेहनत लगेचच लक्षात येत आहे. अवघ्या दोन अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये प्रसाद ओकने आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. 'हिंदू असणं गुन्हा झालाय... बहुसंख्य आहोत पण एकसंध नाही' जिथं सध्या हिंदू - मुस्लीम हा वाद अगदी क्षुल्लक कारणानंही टोकाशी जात आहे तिथं, 'डोक्यावर टोपी घालून फिरणारा नव्हे, डोक्यात जिहाद घेऊन फिरणारा मुसलमान माझा शत्रू... बाकी सगळे आपलेच' असे संवाद आहेत जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतील याच शंका नाही.
समर्पक कथानक आणि त्याला कलाकारांची जोड मिळालेला 'धर्मवीर' हा चित्रपट 13 मे 2022 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता ही डरकाळी नेमकी कुठवर जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान या चित्रपटाची निर्मती मंगेश देसाई यांनी केली आहे. अनेक नाटकं, चित्रपट आणि टीव्ही मालिकांतून आपलं अभिनेता म्हणून त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं आहे. मंगेश देसाई हे (Mangesh Desai) साहिल मोशन आर्टस् या निर्मिती संस्थेतर्फे ‘धर्मवीर’ या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. चित्रपट निर्माता म्हणून पदार्पण करण्यासाठी मंगेश यांनी अतिशय आव्हानात्मक विषयाची निवड केली आहे.
‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटानंतर ‘धर्मवीर’ चित्रपटाचे लेखन- दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केलं आहे.