फत्तेशिकस्त सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड, पहिल्या विकेंडला कमावले 'इतके' कोटी

मराठी पिक्चर बारी
Updated Nov 18, 2019 | 23:34 IST | चित्राली चोगले

महाराष्ट्रातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची गोष्ट सांगणारा फत्तेशिकस्त सिनेमाने पहिल्याच विकेंडला बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केलीय. सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच विकेंडला बॉक्स ऑफिसवर ३.५ कोटींचा गल्ला कमवलाय.

fatteshikast based on shivaji maharaj’s first ever surgical strike crosses the 3.5 crore mark in the first weekend at box office
फत्तेशिकस्त सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड, रिलीजच्या पहिल्या विकेंडला कमावले ३.५ कोटी 

थोडं पण कामाचं

  • 'फत्तेशिकस्त' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी
  • रिलीजच्या पहिल्याच विकेंडला कमावले ३.५ कोटी
  • महाराष्ट्राभरात सिनेमाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद

मुंबई: How’s the josh म्हणत एक सर्जिकल स्ट्राईक घडला पण त्याआधी महाराष्ट्राच्या मातीत हर हर महादेव म्हणत शिवछत्रपतींनी पहिलं सर्जिकल स्ट्राईक घडवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पहिल्या-वहिल्या सर्जिकल स्ट्राईकची गोष्ट सांगणारा फत्तेशिकस्त हा मराठी सिनेमा नुकताच भेटीला आला आहे. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी, नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके याचसोबत हिंदीतला प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी यांसारख्या मातब्बर कलाकारांची फौज फत्तेशिकस्त सिनेमात पहायला मिळते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. रिलीजच्या पहिल्याच विकेंड अंती सिनेमाने तब्बल ३.५ कोटींचा आकडा पार केला आहे.

लोकाग्रहास्तव सिनेमाला १२००पेक्षा जास्त थिएटरमध्ये जवळपास ४०० हून जास्त शोज मिळाले आहेत. तसंच सिनेमाला उत्तम रिव्ह्यूज मिळाताना सुद्धा दिसले. या सगळ्याचा चांगला परिणाम सिनेमाच्या कलेक्शनवर होताना दिसला. रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सिनेमाने तब्बल ६५ लाख कमावले. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सिनेमाने जवळपास १.१७ कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली. हा आकडा तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी १.६८ कोटींवर गेला. असं होत सिनेमाची कमाई तीन दिवसात ३.५ कोटींवर गेली.


‘स्वराज्याचा शत्रू तो साऱ्यांचा शत्रू’ याच न्यायाने छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्मितीसाठी लढले. शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर फत्तेशिकस्त हा सिनेमा आधारित आहे. भारतातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार फत्तेशिकस्त सिनेमातून अनुभवायला मिळतो आहे. ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत या सिनेमाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरचं आहे. दिग्पालने याआधी याच धाटणीतला फर्झंद हा सिनेमा केला होता तो देखील प्रचंड गाजला. शिवाजी महाराजांच्या सिनेमांच्या सीरिजमधला फत्तेशिकस्त हा दिग्पालकडून पुढचा अध्याय आहे.


 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

उद्या फकस्त, फत्तेशिकस्त! #fatteshikasta #releasingtommorrow #15Nov

A post shared by Chinmay Deepak Mandlekar (@chinmay_d_mandlekar) on

शिवरायांच्या अष्टावधानी नेतृत्वाची, शौर्याची महती, त्यांच्या साथीदारांचा अजोड पराक्रम, शिस्तबद्ध आखणी या साऱ्यांचा अनुभव देणारा हा सिनेमा नव्या पिढीला खूप काही शिकवणारा असेल असं सिनेमाच्या टीमचं मत आहे. शिवाजी महाराजांचा प्रत्येक गुण आत्मसात करण्याची संधी या सिनेमाच्या निमित्ताने मिळाल्याची भावना कलाकारांनी सिनेमाच्या रिलीजआधी व्यक्त केली होती. या सगळ्यामुळे सध्या या सिनेमाची उत्तम कामगिरी बॉक्स ऑफिसवर होताना दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी