Hirkani Trailer: ‘हिरकणी’ अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

मराठी पिक्चर बारी
Updated Oct 14, 2019 | 13:15 IST | चित्राली चोगले

प्रत्येक आई असतेच हिरकणी असं म्हणत हिरकणीचं पोस्टर भेटीला आलं. त्यानंतर सिनेमाचं टीझर आणि गाणं देखील रिलीज झालं. आता खुद्द माधुरी दीक्षितने सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज केला आहे. पाहा त्याची झलक.

madhuri dixit launches the nail biting trailer of upcoming marathi film hirkani
Hirkani Trailer: माधुरी दीक्षितने केला ‘हिरकणी’ सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • माधुरी दीक्षितकडून 'हिरकणी' सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज
  • अजय देवगनने देखील शेअर केली हिरकणीच्या साहसगाथेची झलक
  • हिरकणी सिनेमा येत्या २४ ऑक्टोबर रोजी भेटीला

मुंबई: प्रत्येक आई असतेच हिरकणी... असं म्हणत एका नवीन मराठी सिनेमाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि हा सिनेमा लवकरच भेटीला येणार हे कळताच सिनेमाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली. त्यानंतर सिनेमाचं पोस्टर भेटीला आला, मग आला सिनेमाचा टीझर आणि सिनेमाचं पहिलं गाणं सुद्धा नुकतंच रिलीज केलं गेलं. ते सुद्धा नॅशनल क्रश विकी कौशलकडून. आता मात्र बॉलिवूडच्या अजून एका मोठ्या नावाने या सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज केला आहे. खुद्द माधुरी दीक्षितने हिरकणी सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर नुकताच रिलीज केला असून ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसंच बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनने सुद्धा हिरकणीच्या साहसगाथेची झलक त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.

ट्रेलर पाहून सिनेमाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली नाही तरच नवल. शिव छत्रपतींच्या काळात घडणारी ही गोष्ट कायम पाठ्यपुस्तकात वाचली आहे. आता मात्र ही साहसी हिरकणी मोठ्या पडद्यावर उभी राहणार आहे. सोनाली कुलकर्णीने साकारलेल्या हिरकणीची झलक या नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलर मधून पहायला मिळते. सिनेमातला सोनालीचा अनोखा लूक, तिची वेगळी भाषा सुद्धा या ट्रेलरमध्ये नक्कीच अधोरेखित होते. तसंच नुकतंच सिनेमाचा गाणं रिलीज झालं ज्यामध्ये जीवाची झलक दिसली आणि तोच जीवा म्हणजे अमित खेडेकर सुद्धा ट्रेलरमध्ये दिसून येतो. हिरकणीची गोष्ट सगळ्यांनाच खूप चांगली ज्ञात आहे पण ती मोठ्या पडद्यावर कशी रेखाटली जाते हे बघण्यात सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्याची झलक हा ट्रेलर अगदी उत्तमपणे देऊन जातो यात काहीच दुमत नाही.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक प्रसाद यांनी पुन्हा एकदा कमाल केली आहे याचा अंदाज हा ट्रेलर देतो. गडाचे दरवाजे बंद झाल्यावर आख्खा गड उतरून येणारी साहसी आई म्हणजे हिरकणी या ट्रेलरमध्ये अगदी उत्तमरीत्या साकारली गेली आहे. तिच्या समोर येणारी आव्हानं, तिचा हा गाठलेला पल्ला किती कठीण होता, या सगळ्याची जाणीव अगदी काही मिनिटांचा ट्रेलर सहजपणे देऊन जातो.  सिनेमाच्या टीझरला आणि गाण्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद या ट्रेलरला सुद्धा मिळताना दिसत आहे. त्यामुळे सिनेमाला सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळेल असा अंदाज सध्या वर्तवला जात आहे. सोनाली कुलकर्णी आणि अमित खेडेकर शिवाय सिनेमात बरीच मोठी नावसुद्धा पाहायला मिळणार आहेत.


 

सध्या हिरकणी सिनेमाची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे सिनेमाबद्दल आपसूकच एक कुतूहल निर्माण झाला आहे. त्यात सध्या बॉलिवूडचा सुद्धा लक्ष या सिनेमाने वेधून घेतला आहे. गडाचं आव्हान तर हिरकणीने पार केलं, आता बॉक्स ऑफिसवरचं आव्हान हिरकणी सिनेमा कसा पार करतो ते पहावं लागेल. चिन्मय मांडलेकर लिखित हिरकणी सिनेमाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली आहे. राजेश मापुस्कर हे या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला हिरकणी संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी