हैदराबाद एन्काउंटर : अभिनेता प्रविण तरडेंना आठवली शिवशाही... पाहा काय म्हटले ते... 

मुळशी पॅटर्न फेम अभिनेता, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी आपल्या फेसबूक प्रोफाईलच्या माध्यमातून हैदराबाद एन्काउंटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

marathi actor pravin tarde hyderabad rape telangana police rape accused encounter Crime news in marathi google newsstand
हैदराबाद एन्काउंटर : अभिनेता प्रविण तरडेंना आठवली शिवशाही... पाहा काय म्हटले ते...   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : हैदराबादजवळ असलेल्या सायबराबाद येथे  महिला डॉक्टरसोबत क्रूर कृत्य करुन तिचा जीव घेणाऱ्या चार नराधम आरोपींना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केलं आहे. पोलीस आरोपींना घटनेच्या रिक्रिएशनसाठी घटनास्थळी घेऊन गेली होती. या प्रकरणावर सर्व सामान्य नागरिक, राजकारणी आणि सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण आपली प्रतिक्रिया विविध माध्यमातून व्यक्त करीत आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यात पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे, तर काही जण ही चकमक खरी होती का यावर शंका उपस्थित करीत आहेत. यात मुळशी पॅटर्न फेम अभिनेता, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी आपल्या फेसबूक प्रोफाईलच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

प्रविण तरडे यांनी आपल्या फेसबूक प्रोफाईलवर पोस्ट करताना म्हटले की “हैदराबादमध्ये खरी शिवशाही, जागेवर फैसला” या प्रतिक्रियेच्या माध्यमातून त्यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे समर्थन केले आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात रयतेला छळणारा, महिलांवर अत्याचार करणाऱ्याला तात्काळ शिक्षा सुनावली जात होती.  रांझ्याच्या पाटील बाबाजी गुजर याने एका महिलेसोबत अत्याचार केले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर ही घटना निवाड्यासाठी आली होती. त्यावेळी त्यांनी त्याचे हात पाय छाटून चौरंग केल्याची घटना प्रसिद्ध आहे. याच घटनेचा संदर्भ लक्षात ठेऊन प्रविण तरडे यांनी हैदराबादमध्ये खऱी शिवशाही अवतरली असे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच जागेवरच फैसला झाला असल्याचे म्हटले आहे. 

तरुणीची हत्या झालेल्या ठिकाणीच आरोपीही झाले ठार 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आलं होती त्याच ठिकाणी आरोपींचा देखील चकमकीत मृत्यू झाला. ज्या ठिकाणी घटना घडली तिथे क्राईम सीन रिक्रिएशन करण्यासाठी नेण्यात आलं होतं. कारण की, या खटल्यात कोणतीही कमतरता राहू नये. खटल्यात पुरावे मजबुतीने सादर करण्यात यावे यासाठी पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेलं होतं. हे सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते. चौकशीदरम्यान सर्व आरोपींनी मान्य केले होतं की, त्यांनी महिला डॉक्टरसोबत अत्यंत क्रूरतेने बलात्कार करुन तिची हत्या केली होती. त्यानंतर कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. 

कट रचून आरोपींनी केला होता बलात्कार आणि हत्या 

२७-२८ नोव्हेंबरच्या रात्री चार आरोपींनी या भंयकर घटनेचा संपूर्ण कट रचला होता. महिला डॉक्टरने सायबराबाद टोल प्लाज पार्किंगमध्ये आपली स्कूटी पार्क केली होती. जेव्हा ती आपलं काम संपवून घरी जाण्यासाठी पार्किंगमध्ये आली तेव्हा तिला आपली स्कूटी पंचर झाल्याचं दिसून आलं. खरं तर आरोपींपैकी एकानेच तरुणीची स्कूटी पंचर केली होती. 

यानंतर कटाप्रमाणे एका आरोपीने डॉक्टर महिलेला मदत करण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर स्कूटी ठिक करण्याच्या बहाण्याने तरुणीला काहीसं दूर नेलं आणि चौघांनी तरुणीला बंदी बनवलं. त्यानंतर त्यांनी तिला एका दुसऱ्या ठिकाणी नेलं आणि तिच्यावर पाशवी बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी हत्या करुन तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. 

पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी केली होती न्यायाची मागणी 

पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी केली होती. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात होती. याप्रकरणी संसदेत देखील आवाज उठविण्यात आला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी