मुंबई : अभिनेत्री हेमांगी कवीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर आपले रोखठोक मत मांडले आहे. त्यामुळे तिचे चाहते आणि सोशल मीडियाची ट्रोल आर्मी यांना चांगलेच खाद्य मिळाले आहे. अनेक कलाकार हल्ली सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कलाकारांसाठी सोशल मीडिया हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. मात्र त्यामुळे अनेक वादंगसुद्धा निर्माण होत असतात.
हेमांगी कवी ही मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या रोखठोक मतांसाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा सोशल मीडियावर हेमांगी व्यक्त होत असते. आताही असेच झाले असून तिने व्यक्त केलेल्या एका पोस्टवर सोशल मीडियावर, विशेषत: फेसबुकवर कॉमेंट्सचा पाऊस पडतो आहे. तिच्या बाजूने आणि तिच्यावर टिका करत नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर नेटकरी कसे ट्रोल करतात, कमेंट्स करतात यावर रोखठोक बोलताना, फेसबुकवरील आपल्या एका पोस्टमध्ये हेमांगी कवीने सचिन तेंडुलकरचे उदाहरण दिले आहे. 'काही मूर्ख, अपात्र लोक सोशल मीडियावर सचिन तेंडुलकरसारख्या भारतरत्न व्यक्तीवरही टीका करतात. सचिनला कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्याच्या आजारपणावर ज्याला जसे वाटेल तसे तो कमेंट करत असतो. सचिनलादेखील ट्रोल केले जाते. जर सचिनसारख्या व्यक्तिमत्वावरही लोकं अशा प्रकारे प्रतिक्रिया देत असतील तर तिथे मी कोण ? ट्रोल केल्यामुळे मला त्रास होईल असे जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. मी मस्त आहे. तुमच्या काळजीबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देते. (सचिन आपलाच वाटतो म्हणून त्याचा उल्लेख एकेरी संबोधनाने)
अभिनेत्री हेमांगी कवीचं मुंबईतील नव्या घराचं स्वप्न पूर्ण
सोशल मीडियावर हेमांगी नेहमी व्यक्त होत असते. आपले वेगवेगळे फोटोदेखील ती शेअर करत असते. त्यामुळे तिच्या पोस्टवर नेहमीच प्रतिक्रिया उमटत असतात. आपल्या अभिनयाचा ठसा तिने मराठी चित्रपट, नाटकांमधून उमटवलाय. सध्या मालिकांमधूनही चाहत्यांसमोर येते आहे. तिची तेरी लाडली मैं ही मालिका सध्या चर्चेत आहे.
चित्रपटसृष्टीतील कलाकार किंवा सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर करत असतात. विविध विषयांवरची आपली मते, आपल्या भूमिका लोकांसमोर मांडण्यासाठी तसेच चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी, आपल्या ताज्या घडामोडी आपल्या चाहत्यांपर्यत पोचवण्यासाठी सोशल मीडियातील पोस्ट, फोटो यांचा वापर कलाकारांकडून किंवा सेलिब्रिटींकडून होत असतो. त्यातून मग चाहते किंवा नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देतात, कॉमेंट्स टाकतात आणि वेळप्रसंगी ट्रोलसुद्धा करतात. यातून बऱ्याचवेळा वादंगसुद्धा निर्माण होत असतात. काही कलाकार या पासून दूर राहतात तर काही कलाकार मात्र सोशल मीडियाद्वारे आपली रोखठोक मते मांडत असतात. काही वेळा त्यांच्या चाहत्यांना त्यांची मते आवडतात तर काही वेळा कलाकार टिकेला पात्र ठरतात. सोशल मीडियावर कोणत्याही विषयात चटकन प्रतिक्रिया येत असतात.