Hirkani Teaser: सोनाली कुलकर्णीच्या हिरकणी सिनेमाचा मन हेलावून टाकणारा टीझर भेटीला

मराठी पिक्चर बारी
Updated Oct 03, 2019 | 16:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

शिव छत्रपतींच्या सुवर्ण काळातील एक सुवर्ण पान असलेल्या हिरकणीची गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणारे. सिनेमात सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत झळकणार हे जाहीर केल्यावर आता सिनेमाचा टीझर रिलीज केला गेलाय.

marathi film hirkani’s teaser takes you on an emotional journey
Hirkani Teaser: सोनाली कुलकर्णीच्या हिरकणी सिनेमाचा मन हेलावून टाकणारा टीझर भेटीला  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • मन हेलावून टाकणारं हिरकणी सिनेमाचा टीझर भेटीला
  • अवघ्या काही सेकंदात सिनेमाची झलक शहारे आणते
  • सोनाली कुलकर्णीचा वेगळा लूक आणि भाषा अधोरेखीत होते

मुंबई: शिवाजी महाराजांच्या सुवर्ण काळातील एक सुवर्ण पान असलेल्या धाडसी हिरकणीची गोष्ट मोठ्या पडद्यावर लवकरच अनुभवायला मिळणार आहे. हिरकणी हा आगामी मराठी सिनेमा मध्यंतरी जाहीर झाला आणि सिनेमाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली. त्यात सिनेमाचं राज्याभिषेक गीत देखील रिलीज केलं गेलं, जे प्रचंड लोकप्रिय ठरलं. त्यानंतर लक्ष होतं ते या सिनेमाच्या टायटल रोलकडे. या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित सिनेमात मुख्य भूमिकेत सोनाली कुलकर्णी दिसणार हे देखील नुकतंच जाहीर झालं. त्याचसोबत सिनेमाचा अजून एक मुख्य चेहरा अमित खेडेकर जो जिवा साकारणार आहे हे देखील उघड झालं. यानंतर आता सिनेमाचा टीझर भेटीला आला आहे आणि सिनेमाच्या उत्सुकतेत भर पडली आहे हे निश्चित.

हिरकणी सिनेमाच्या या अवघ्या काही सेकंदांच्या टीझरनं बरंच कुतूहल निर्माण केलं आहे. पाठ्यपुस्तकातील ही गाजलेली हिरकणीची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. पण ती मोठ्या पडद्यावर कशी रंगणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक प्रसाद ओक या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावत आहे. त्याच्या दृष्टीनं हा सिनेमा कसा रेखाटला गेला आहे त्याची झलक या टीझरमध्ये नक्कीच पाहायला मिळते.

 

घरात एकटं असलेलं तान्हं बाळ आणि गडावर असलेली त्याची आई हिरकणी, संध्याकाळी बंद होणारे गडाचे दरवाजे आणि त्यानंतरची आईच्या मनाची घालमेल, हे सगळं या टीझरमध्ये अवघ्या काही सेकंदांमध्ये अगदी योग्य पद्धतीत टिपलं गेलं आहे. त्यानंतर मन हेलावून टाकतो तो या टीझरचा शेवट. गडाचे दरवाजे बंद होताच हिकरणीने गड उतरायला केलेल्या सुरुवातीची छोटी झलक टीझरमध्ये  शेवटाकडे दिसते. ते पाहुन नक्कीच प्रत्येक आई असतेच... हिरकणी... ही सिनेमाची टॅगलाईन एकदम योग्य वाटते. तसंच सोनालीचा सिनेमातला लूक आणि तिची भाषा सुद्धा अधोरेखीत झाल्याशिवाय राहत नाही.

 

 

टीझर सध्या प्रचंड गाजत असून त्याबद्दल बऱ्याच उत्तम प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. नुकतंच रिलीज झालेल्या सिनेमाच्या मोशन पोस्टरला देखील असाच प्रतिसाद मिळाला होता. या टीझरला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिलीज केलं गेलं आहे. फक्त यूट्युबवर या टीझरला २ लाखांच्या घरात लाईक्स मिळाले आहेत. चिन्मय मांडलेकर लिखीत या सिनेमाच्या ट्रेलरची आता प्रतीक्षा लागलेली आहे हे काय वेगळं सांगायला नको. अजून अख्खा कडा बाकी आहे... म्हणत जीवाची परवा न करता गड उतरणाऱ्या या हिरकणीची झलक शहारे आणल्या शिवाय राहत नाही हे नक्की. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ सिनेमाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली आहे आणि राजेश मापुस्कर या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. कार्यकारी निर्माते म्हणून रत्नकांत जगताप यांनी काम पाहिले आहे. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ संपूर्ण महाराष्ट्रात धमाका करत बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी