ट्रिपल सीट सिनेमातलं ‘नाते हे कोणते’ गाणं भेटीला, अंकुश चौधरी-शिवानी सुर्वेच्या केमिस्ट्रीची झलक

मराठी पिक्चर बारी
Updated Sep 26, 2019 | 21:01 IST | चित्राली चोगले

अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्या मुख्य भूमिका असलेला ट्रिपल सीट सिनेमा लवकरच भेटीला येणार आहे. सिनेमाची उत्सुकता अधिक ताणण्यासाठी सिनेमाच्या टीझरनंतर लगेचच सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे.

marathi film triple seat song naate konte he releases
ट्रिपल सीट सिनेमातलं ‘नाते हे कोणते’ गाणं भेटीला, अंकुश चौधरी-शिवानी सुर्वेच्या केमिस्ट्रीची झलक 

थोडं पण कामाचं

  • ट्रिपल सीट सिनेमातलं पहिलं गाणं 'नाते कोणते हे' रिलीज
  • गाण्यात दिसली अंकुश-शिवानीच्या केमिस्ट्रीची झलक
  • ट्रिपल सीट सिनेमा येत्या २५ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार

मुंबई: अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील हे त्रिकूट असलेला ट्रिपल सीट हा सिनेमा लवकरच भेटीला येणार आहे. सिनेमाच्या पोस्टरनंतर सिनेमाचा धमाल टीझर नुकताच भेटीला आला. टीझर पाहुन सिनेमाबद्दलची उत्सुकता निश्चितच वाढली. आता या सिनेमातलं पहिलं-वहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. मराठीतला सुपरस्टार अभिनेता अंकुश चौधरी आणि बिगबॉस फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे यांच्यातील केमिस्ट्री दाखवणारं ट्रिपल सीट सिनेमातलं ‘नाते हे कोणते’ हे गाणे येताच त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर रिलीज केलं गेलं आहे आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित ट्रिपल सीट या सिनेमाचं दिग्दर्शन संकेत पावसे यांनी केलं आहे. अविनाश विश्वजित यांनी संगीतबद्ध केलेले ‘नाते हे कोणते’ हे गाणे हरगुन कौर आणि रोहित राऊत यांनी आपल्या सुरेल आवाजात गायलं आहे. गाण्याच्या बोलाप्रमाणेच ‘नाते हे कोणते, कोणास ना, कळले कधी’ अशी या दोघांच्याही मनाची अवस्था या गाण्यात झालेली दिसते. या गाण्यात अंकुश आणि शिवानी दोघंही भान विसरून एकमेकांशी फोनवर गप्पा मारताना दिसत आहेत. या दोघांच्या वायरलेस प्रेमाची गोष्ट अशी सिनेमाची टॅगलाईन आहे. त्यामुळे त्यांच्या या वायरलेस प्रेमात खुलणाऱ्या केमिस्ट्रीची झलक गाण्यात नक्कीच दिसून येते.

‘नाते हे कोणते’ या गाण्यात अंकुश आपल्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत असतानाही केवळ शिवानीसोबत फोनवर बोलण्यात गुंग दिसतो, तसंच शिवानी सुद्धा आपल्या घरी, कॉलेजमध्ये असतानाही सतत फोनवर बोलताना दिसते. बऱ्याचदा अंकुशच्या या फोनवर बोलण्यामुळे त्याच्या मित्रांची धमाल उडते आणि शिवानीला चक्क पेपर सोडवताना तिच्या सभोवतालची सर्व लोकंसुद्धा फोनवर बोलताना दिसतात. नेमकं शिवानी आणि अंकुश यांच्यातील हे नाते काय आहे? फक्त एक मिसकॉल तुमचे आयुष्य बदलू शकतो, या संदेशाचे मोठे बॅनर अंकुशला या गाण्यात दिसतात. याच सगळ्या अवती भवती हे गाणं आणि हा सिनेमा रेखाटला गेला आहे. या गाण्यानंतर तर या सिनेमाविषयी प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

ट्रिपल सीट सिनेमामध्ये अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्यासह प्रविण विठ्ठल तरडे, शिल्पा ठाकरे, राकेश बेदी, विद्याधर जोशी, वैभव मांगले, योगेश शिरसाट आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांची निर्मिती असलेल्या ट्रिपल सीट या सिनेमाचे सहनिर्माते स्वप्नील संजय मुनोत आणि सहाय्यक निर्माते अॅड. पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. ट्रिपल सीट हा सिनेमा येत्या २४ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार होता पण आता विधानसभा निवडणुकांच्या निकालामुळे सिनेमा आता येत्या २५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी