अजय देवगणच्या 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' सिनेमाबद्दल मनसेने घेतला 'हा' मोठा निर्णय

मराठी पिक्चर बारी
Updated Nov 21, 2019 | 18:02 IST | चित्राली चोगले

तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमा लवकरच भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. शिवछत्रपतींच्या शूर मावळा असलेले तानाजी मालुसरेंच्या आयुष्यावर बनत असलेल्या या सिनेमाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक निर्णय घेतला आहे.

mns takes a new stand against tanhaji the unsung warrior movie
अजय देवगणच्या 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' सिनेमाबद्दल मनसेने घेतला 'हा' मोठा निर्णय  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • 'तान्हाजी द अनसंग वॉरियर'च्या बाबतीत मनसेचा मोठा निर्णय
  • सिनेमा हिंदीसोबत मराठीत डब करण्यासाठी दिली परवानगी
  • खुद्द मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलं जाहीर

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ‘खळखट्याक’ हे आंदोलन बरंच प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात अजून मराठी सिनेमावर होणारा अन्याय या विरोधात कायमच मनसेची चित्रपट सेना न्याय मिळवून देण्यात अग्रगण्य राहिली आहे. मराठी सिनेमांच्या न्यायासाठी अनेकदा मनसे स्टाईल आंदोलनही केली गेली आहेत. यातच मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने हिंदी सिनेमांना मराठीत डब होण्याला विरोध दर्शवला. मनसेने आपली बाजू ठाम मांडत महाराष्ट्रात बॉलिवूड सिनेमा मराठीत डब होऊ देणार नाही असा निर्णय जाहीर केला. पण लवकरच रिलीज होणाऱ्या तान्हाजी द अनसंग वॉरियरबद्दल या निर्णयात फेरबदल करण्यात येणार असं दिसून येत आहे.

काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेला अक्षय कुमारचा मिशन मंगल हा सिनेमा मराठीत डब होणार असं जाहीर होताच मनसे चित्रपट सेना याच्या विरोधात ठामपणे समोर आली. या गोष्टीला संपूर्ण विरोध दर्शवत यामुळे मराठी सिनेमांच्या मार्केटवरती याचा दुष्परिणाम होईल हे कारण मनसे चित्रपट सेनेकडून दिलं गेलं. पुढे मिशन मंगल हा सिनेमा मराठीत डब होणार नाही असा मिशन मंगल सिनेमांच्या निर्मात्यांनी जाहीर केलं. त्यावेळीच मनसे चित्रपट सेनेने असं सुद्धा जाहीर केलं की इथून पुढे कुठल्याही बॉलिवूड सिनेमाला मराठीत डब होऊ देणार नाही. आता मात्र ‘तान्हाजी…’ बाबतीत हा नियम बदलला गेला आहे.

 

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि मनसेचे उपाध्यक्ष असलेले अमेय खोपकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यात ते म्हणतात की, "शिवरायांचे आठवावे. रूप शिवरायांचा आठवावा प्रताप. हिंदी चित्रपट मराठी भाषेत डब करून प्रदर्शित करण्याला मनसेचा विरोध आहेच परंतु तान्हाजी हा सिनेमा जगभरातल्या भाषांत डब करून प्रदर्शित व्हावा. यानिमित्तानं आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निधड्या मावळ्यांचा पराक्रम जग पाहील. दिग्दर्शक ओम राऊत आणि अभिनेता अजय देवगण यांचे अभिनंदन."

 

यावर अजयने देखील अमेय यांचे आभार मानले आहेत. आभार मानत अजय म्हणाला,’ अमेय तान्हाजीचं कौतुक करण्यासाठी आभार. आमचा सिनेमा हिंदी आणि मराठीमध्ये दाखवण्याची परवानगी दिल्याबद्दलही आभार. मराठी शूरवीर सरदारांची गाथा त्यांच्या मातृभाषेत आणि राष्ट्रभाषेत एकत्र मांडण्यास मिळणं हे आमच्यासाठी भाग्याचं आहे.’ मनसेने घेतलेला हा निर्णय तान्हाजी सिनेमासाठी नक्कीच खूपच फायद्याचा ठरणार आहे. तान्हाजी मराठीत सुद्धा डब होईल अशी चिन्ह आता निर्माण झाली आहेत. शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतिशय जवळचे असलेले शूर मावळे तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमा प्रत्येकाने अनुभव असाच आहे. त्यातही मराठी मातीतला हा इतिहास सर्वत्र पोहचावा ही त्याच्या मागची सुप्त इच्छा सुद्धा नक्कीच असणार आहे. त्यामुळे तान्हाजीसाठी मनसेने निर्णयात केलेला हा फेरबदल नक्कीच एक चांगली गोष्ट आहे. सिनेमा मराठी डब झाला तर मराठी प्रेक्षकांना त्याचा अधिक उत्तम पद्धतीने आस्वाद घेता येईल हे सुद्धा तितकच खरं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी