नॅशनल क्रश अभिनेता विकी कौशलकडून मराठी सिनेमा 'हिरकणी'चं पहिलं गाणं रिलीज

मराठी पिक्चर बारी
Updated Oct 09, 2019 | 14:10 IST | चित्राली चोगले

आगामी सिनेमा हिरकणी सध्या बराच चर्चेत आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासातील ही गाजलेली गोष्ट मोठ्या पडद्यावर उभी राहत आहे. या सिनेमाची उत्सुकता अधिक ताणली जेव्हा खुद्द विकी कौशलने सिनेमाचं गाणं रिलीज केलं

national crush vicky kaushal releases song of upcoming marathi film hirkani
नॅशनल क्रश अभिनेता विकी कौशलकडून बहुप्रतिक्षीत मराठी सिनेमा 'हिरकणी'चं पहिलं गाणं रिलीज  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • अभिनेता विकी कौशलकडून हिरकणी सिनेमाचं गाणं झालं रिलीज
  • हिरा-जिवाच्या नात्यावर आधारित गाणं ‘जगनं हे न्यारं झालं जी’
  • गाणं शेअर करत विकीने दिल्या सिनेमाच्या टीमला शुभेच्छा

मुंबई: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत हिरकणी सिनेमाचा टीझर नुकताच भेटीला आला. त्यातून सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यावर आपले बाळ घरी एकटे आहे, भुकेलं आहे या विचाराने व्याकूळ झालेली आई म्हणजे हिरकणीची झलक प्रेक्षकांना नुकतीच अनुभवायला मिळाली. या टीझरमुळे सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचली. हिच वाढलेली उत्सुकता अधिक ताणण्यासाठी या सिनेमाच्या मेकर्सनं अजून एक खास गोष्ट केली आहे. या सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज केलं गेलं आहे आणि ते सुद्धा खुद्द अभिनेता विकी कौशलकडून. नॅशनल क्रश असलेल्या विकीने हे गाणं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन रिलीज करताच गाण्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. विकीच्या फॅन फॉलोविंगचा देखील या गाण्याला निश्चित फायदा झाला. तसंच बॉलिवूडचं लक्ष देखील या गाण्याकडे गेलं.

या गाण्यातून आता प्रेक्षकांना माय माऊली हिरकणी उर्फ हिराच्या आयुष्यातील महत्त्वाच्या आणि प्रेमळ अशा व्यक्तिरेखेबद्दल अधिक खुलासा होताना दिसतो, ज्याच्यावर हिराचा जीव जडलाय. हिराचं ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम आहे ती व्यक्ती म्हणजे जीवा. हिरकणी सिनेमात जीवा या व्यक्तिरेखेची भूमिका अभिनेता अमित खेडेकर यानं साकारली आहे. सोनाली कुलकर्णी आणि अमित यांची ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांना लवकरच या सिनेमात अनुभवयाला मिळणार आहे.

 

सोनाली आणि अमित या नव्या जोडीवर आणि त्यांच्या प्रेमकथेवर आधारित ‘जगनं हे न्यारं झालं जी’ हे नुकतंच रिलीज झालेल्या या गाण्याचे शीर्षक आहे. या गाण्याचे बोल संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिले आहेत. अगदी सहज-सोप्या शब्दरचनेने देखील प्रेम गीत तयार होऊ शकते आणि ते इतरांना देखील या गाण्याच्या प्रेमात पाडू शकते अशा प्रकारे हे गाणे बनवले गेले आहे. ‘जगनं हे न्यारं झालं जी’ या सुरेल प्रेम गीताला अमितराजने संगीतही दिले आहे आणि त्याने हे गाणं गायले देखील आहे. तसंच गायिका मधुरा कुंभार हिने अमितराज यांना गाण्यात साथ दिली आहे.

 

हे गाणं खुद्द अभिनेता विकी कौशलने त्याच्या ट्विटरवरुन रिलीज करताच सोशल मीडियावर गाण्याबद्दल बरीच चर्चा रंगली. एवढंच नाही तर गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळताना देखील दिसत आहे. विकीने हे गाणं शेअर करत हिरकणी सिनेमाच्या टीमला शुभेच्छा ही दिल्या. शिवराज्याभिषेक गीत, मोशन पोस्टर, टीझर या माध्यमांतून हिरकणी सिनेमाची झलक प्रेक्षकांपर्यंत पोहचली आणि आता हिरा-जीवाचं प्रेम गीत ‘जगनं हे न्यारं झालं जी’ प्रेक्षक पसंती मिळवण्यात यश मिळवत आहे असं दिसत आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित हिरकणी सिनेमाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली आहे. राजेश मापुस्कर हे या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला हिरकणी संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी