राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं पुण्यात निधन

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मोहोर उमटवणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक व समाज अभ्यासक सुमित्रा भावे (Sumitra Bhave) यांचे निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत माळवली.

National Film Award winning director Sumitra Bhave passes away in Pune
प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं पुण्यात निधन  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • सुमित्रा भावे यांच्यावर पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते
  • वयाच्या ७८ व्या वर्षी सुमित्रा भावे यांनी घेतला जगाचा निरोप
  • १९८५ मध्ये 'बाई' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कुटुंबकल्याण चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

पुणे : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर(National Film Award) मोहोर उमटवणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक व समाज अभ्यासक सुमित्रा भावे (Sumitra Bhave) यांचे निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत माळवली. पुण्यातील खासगी रुग्णालयात सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. (National Film Award winning director Sumitra Bhave passes away in Pune)

सुमित्रा भावे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. भावे यांच्या निधनामुळं पुण्यातील, तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक विश्वावर शोककळा पसरली आहे. पठडीबाहेरची वाट चोखाळणाऱ्या एका प्रतिभावंत दिग्दर्शिकेला गमावल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे. 

सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या कासव चित्रपटाला २०१६ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय नितळ, अस्तु देवराई यासारखे अनेक आशयघन चित्रपट त्याने दिग्दर्शित केले आहेत. सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली. 'बाई', 'पाणी' या सुरुवातीच्या लघुपटांना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये 'दोघी' हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले 'दहावी फ', 'वास्तुपुरुष', 'देवराई', 'बाधा', 'नितळ', 'एक कप च्या', संहिता, 'घो मला असला हवा', 'कासव', 'अस्तु' हे चित्रपट गाजले. 'दिठी' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. त्यांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत नावाजले गेले; तर अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. 'विचित्र निर्मिती' या बॅनरखाली तयार झालेल्या, विविध सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या त्यांच्या चित्रपटांचा चाहतावर्ग मोठा आहे. सोनाली कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन तेंडुलकर अशा अनेक कलाकारांना सुमित्रा भावे यांच्याकडे सिनेमाचे धडे गिरवता आले.

सुमित्रा भावे यांच्याविषयी थोडक्यात 


भावे यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ मध्ये पुण्यात झाला. फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळविल्यानंतर मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेतून त्यांनी ग्रामीण विकास या विषयात पदविका मिळविली. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विना मोबदला काम केले. पूर्ण वेळ समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करायचे ठरविल्यानंतर सुमित्रा भावे अपघातानेच लघुपटाकडे वळल्या. मात्र, या माध्यमाची ताकद लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. वयाच्या पंच्चाहत्तरीनंतरही त्या सिनेसृष्टीत जोमाने कार्यरत होत्या. सुमित्रा भावे यांनी ऑल इंडिया रेडिओ, नवी दिल्ली येथे मराठी भाषेच्या वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले आहे.

सुमित्रा भावे यांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार

बाई – १९८५– सर्वोत्कृष्ट कुटुंबकल्याण चित्रपट
पाणी – १९८७ – सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट
वास्तुपुरुष – २००२ – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
देवराई – २००४ – सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट
अस्तु – २०१३ – सर्वोत्कृष्ट पटकथा
कासव – २०१६ – सर्वोत्कृष्ट चित्रपट

राज्य शासन पुरस्कार विजेते चित्रपट

दोघी
दहावी फ
वास्तुपुरुष
नितळ
एक कप च्या

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी