Sai Tamhankar’s Next: ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ सिनेमात सई ताम्हणकर धाडसी भूमिकेत

मराठी पिक्चर बारी
Updated Sep 30, 2019 | 14:46 IST | चित्राली चोगले

गर्लफ्रेंड सिनेमातून एका अनोख्या भूमिकेत दिसलेली सई ताम्हणकर आता सज्ज झाली आहे एक नवं आव्हान स्विकारण्यासाठी. सईचा आगामी सिनेमा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ नुकताच घोषित झाला आहे आणि सिनेमाचं पोस्टर भेटीला आलंय.

sai tamhankar’s next Marathi movie announced will be seen in kulkarni chaukatla deshpande
Sai Tamhankar’s Next: ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ सिनेमात सई ताम्हणकर धाडसी भूमिकेत 

थोडं पण कामाचं

  • गर्लफ्रेंड सिनेमानंतर सई ताम्हणकरची धाडसी भूमिका
  • सईच्या आगामी ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ सिनेमाचं पोस्टर भेटीला
  • सिनेमा येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: मराठीतली ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर नुकतीच गर्लफ्रेंड या मराठी सिनेमात दिसली. तिच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. बऱ्याच दिवसांनी सई एका वेगळ्या भूमिकेत दिसली आणि तिनं साकारलेली गर्लफ्रेंड सगळ्यांना प्रेमात पाडून गेली. आता ती सज्ज झाली आहे पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची कमाल दाखवण्यासाठी. सईचा आगामी सिनेमा घोषित झाला असून ती लवकरच कुलकर्णी चौकातला देशपांडे या मराठी सिनेमात झळकणार आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित हा सिनेमा खूपच वेगळा असल्याचं बोललं जात आहे. सिनेमाचं अनोखं पोस्टर नुकतंच रिलीज केलं गेलं आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात ‘नाती’ या शब्दाला खूपच महत्त्व असतं आणि या पलिकडे जाऊन बोलायचं झालं तर त्याहून जास्त महत्त्वाची आहे ती म्हणजे नाती सांभाळण्याची जबाबदारी. पण नाती खरंच तितकी महत्त्वाची असतात? प्रत्येक नात्याची जबाबदारी सांभाळणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत ते कुलकर्णी चौकातला देशपांडे या सिनेमातून. हा सिनेमा आयुष्याच्या वळणावर येणा-या वेगवेगळ्या नात्यांचा प्रवास उलघडताना दिसेल. याच सगळ्या भवती सिनेमाची अनोखी कथा रेखाटली गेली आहे. सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं असून यावर्षीच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

कुलकर्णी चौकातला देशपांडे सिनेमामधून एक धाडसी पाऊल उचलताना सई ताम्हणकर दिसणार आहे. तिला अख्खं आयुष्य बदलून टाकायचं होतं. तिने पेहराव बदलला, तिने घर बदललं, तिने नोकरी बदलली, तिने ऍटिट्युड बदलला, तिने नवरा बदलला, तिने मित्र बदलला, तिने तिचं जगणं बदललं पण तिचं जगणं बदललं का? अशी टॅगलाईन घेऊन सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं गेलं आहे. या सगळ्या भूमिका बदलत गेलेल्या भूमिकामागची भूमिका करणारी सई ताम्हणकर या आगळ्या-वेगळ्या भूमिकेत येतेय सगळ्यांच्या भेटीला. सई व्यतिरिक्त सिनेमात अजून कोण झळकणार याबद्दलची सगळी माहिती सध्या तरी गुपित ठेवली गेली आहे. सध्या सगळा भर सईच्या भूमिकेवर दिला जात आहे. त्यामुळे तिच्या भूमिकेबद्दल आणि सिनेमाबद्दल निश्चितच उत्सुकता ताणली गेली आहे.

 

सिनेमांची पन्नाशी गाठणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे नेहमीच आजपासच्या गोष्टींमधून वेगळा दृष्टिकोन मांडणारा सिनेमा मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. मध्यमवर्गीय बंडखोर बाईची एक बंडखोर गोष्ट त्यांच्या आगामी कुलकर्णी चौकातला देशपांडे मधून अनुभवयाला मिळेल. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे आणि पोस्टरमध्ये दाखवल्यानुसार सई ताम्हणकर मुलगी, पत्नी, आई आणि प्रेयसी या अनेक नात्यांमध्ये दिसणार आहे. स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शि ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे सिनेमाची निर्मिती स्मिता विनय गानू यांनी केली आहे. तर सहनिर्मिती अजित पोतदार आणि सीमा अलापे यांनी केली आहे. झपाट्याने बदलणा-या आजच्या काळात नात्यांचा अक्षांश रेखांशला छेद देणारा कुलकर्णी चौकातला देशपांडे सिनेमा येत्या २२ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी