VIDEO: मराठी कलाकारांना लॉकडाऊनचा फटका, रिंकू राजगुरू, संतोष जुवेकरसह अनेक कलाकार लंडनमध्ये अडकले

Marathi Celebrity stuck in lockdown: अनेक मराठी कलाकार शूटिंगसाठी परदेशात गेले आहेत. मात्र, तेथे अचानक लागू झालेल्या लॉकडाऊनचा त्यांना फटका बसला असून ते तेथेच अडकले आहेत. 

sairaat fame rinku rajguru and many other marathi celebrity stuck in london uk lockdown
मराठी कलाकारांना लॉकडाऊनचा फटका  

थोडं पण कामाचं

  • कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन
  • ब्रिटनमध्ये लागू झालेल्या लॉकडाऊनचा फटका मराठी आणि बॉलिवूड कलाकारांना, अनेक कलाकार लंडनमध्ये अडकले
  • अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता संतोष जुवेकर लंडनमध्ये अडकले

मुंबई : कोरोना व्हायरसवर (Coronavirus) लवकरच लस (Corona vaccine) उपलब्ध होणार असल्याच्या वृत्ताने सर्वांनाच एक मोठा दिलासा दिला. मात्र, त्याच दरम्यान ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन (Coronavirus new strain) समोर आल्याने सर्वांच्या मनात पुन्हा भीती आणि अनेक प्रश्न निर्माण होऊ लगाले आहेत. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या या कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे तेथे प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनचा फटका मात्र, अनेक मराठी आणि बॉलिवूड कलाकारांना बसला (Marathi celebrities stuck in London, UK) आहे.

मराठी कलाकारांना लॉकडाऊनचा फटका 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना आणि संपूर्ण परिस्थिती पूर्ववत येत असल्यामुळे सर्वत्र अनलॉक होण्यास सुरुवात झाली. यामुळे सिनेमांचे, मालिकांचे शूटिंगही सुरू झाले. अशाच प्रकारे मराठी कलाकारही पुन्हा जोमाने कामाला लागले. मराठी कलाकार शूटिंगसाठी लंडनमध्ये दाखल झाले. मात्र, तेथे आढळून आलेल्या नवीन कोरोना विषाणूच्या प्रकारामुळे तेथील प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आणि सर्व कलाकार लंडनमध्ये अडकले.

सैराट सिनेमा फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता संतोष जुवेकर यांच्यासोबत इतरही काही कलाकार लंडनमध्ये अडकले आहेत. अभिनेत्रा संतोष जुवेकर याने फेसबूकवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात संपूर्ण माहिती दिली आहे. संतोष जुवेकर याने म्हटलं, "२४ नोव्हेंबर रोजी मी शूटिंगसाठी येथे आलो. शूटिंग व्यवस्थित पार पडलं. 'डेट भेट' सिनेमाचं शूटिंग झाल्यावर सर्वजण आपआपल्या घरी पोहोचले. मी थांबलो कारण काही मित्रांना भेटायचं होतं आणि इतर काही कामं होती. २२ तारखेचं माझं तिकीट होतं. पण हे तिकीट आता कॅन्सल झालं आहे कारण लॉकडाऊन जाहीर झाला आहे लंडनमध्ये."

अभिनेता संतोष जुवेकरने पुढे म्हटलं, "एक नवीन व्हायरस आढळून आला आहे जो कोरोना हून अधिक वेगाने पसरतो. मी स्वत:ची व्यवस्थित काळजी घेत आहे. देवाच्या कृपेने सुरक्षित आहे. आपण सर्वजण सुरक्षित राहू. ३१ तारखेपर्यंत विमानसेवा बंद आहे आणि आता पुन्हा कधी सुरू होईल माहिती नाही. अर्थात सरकारने जो निर्णय घेतला आहे तो अगदी योग्य आहे. सर्वांच्या काळजीसाठी आहे. या निर्णयाचं कौतुकच आहे. माझ्या काही मित्रांनी मला फोन आला मी त्यांना विचारलं कसं आहे त्यांनी सांगितलं सर्वकाही ठिक आहे. पण मित्रांनो गाफील राहू नका कारण संकट अजून टळलेलं नाहीये. सुरक्षित आणि दक्ष राहणं गरजेचं आहे. काळजी घ्या सर्वांची मी स्वत: इथे काळजी घेत आहे आणि देवाकडे प्रार्थना करत आहे लवकरात लवकर संकट टळो, विमानसेवा सुरू होवो आणि मी लवकरात लवकर घरी पोहोचेल."

बॉलिवूड कलाकारही लंडनमध्ये अडकले

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा ही सुद्धा शूटिंगसाठी लंडनमध्ये पोहोचली होती आणि तेथे लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे प्रियंका चोपडा तेथेच अडकली आहे. प्रियंका चोपडा सोबत सिनेमाचं संपूर्ण शूटिंग क्रू सुद्धा असल्याची माहिती समोर आली आहे. तर अभिनेता अफताब शिवदासानी हा सुद्धा लंडनमध्ये अडकलेला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी