मुंबई: खारी-बिस्कीट नावाचा सिनेमा जाहीर झाला आणि नेमकं या सिनेमाच्या नावात काय दडलं आहे हे कळेच ना. नेमकं काय आहे खारी-बिस्कीट यावर मग बरीच चर्चा झाली. अखेर सिनेमाचं पोस्टर आणि मग त्याच्या टीझरने पडलेल्या अनेक प्रश्नांवर एक गोड उत्तर दिलं ते म्हणजे खारी आणि बिस्कीटच्या रुपात. खारी बिस्कीट म्हणजे नेमके काय या प्रश्नाचं उत्तर तर मिळालं, तसंच सिनेमाचे दोन मुख्य चेहरे खारी आणि बिस्कीट देखील उलघडले गेले. सिनेमात या चिमुरड्या भावंडांची जोडगोळी पाहायला मिळणार हे कळलं आणि सिनेमाची उत्सुकता वाढली. आता या सिनेमाचा ट्रेलर भेटीला आला आहे आणि या उत्सुकतेत भर पडली आहे.
खारीसाठी बिस्कीट आणि बिस्कीटसाठी खारी म्हणजे जीव की प्राण. अवघ्या पाच वर्षांच्या गोंडस खारीची इच्छा म्हणजे आठ वर्षांच्या बिनधास्त बिस्किटसाठी राजकुमारीचा हुकूम. खारी हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नसली तरी ती स्वप्नं बेमालूमपणे पाहते. तिच्या प्रत्येक स्वप्नाला खरं करुन दाखवणं हेच जणू बिस्कीटच्या जगण्याचं कारण आहे असा अंदाज हा ट्रेलर पाहून नक्कीच येतो. या दोन गोंडस भावा-बहिणीच्या प्रेमाची झलक ट्रेलरमधून मिळते आणि ट्रेलर भावतो. पाहा सिनेमाचा हा गोंडस ट्रेलर.
ट्रेलरमध्ये समोर येते खारीची एक खूप मोठी इच्छा. तिने असंच एक स्वप्न पाहिलंय वर्ल्डकपला जाण्याचं. या वर्ल्ड कपच्या तिकीटासाठी खूप पैसे लागतात. ते पैसे खारीचा बिस्कीट कठून बरं आणणार? ही गोड खारी वर्ल्डकप पाहायला जाऊ शकेल का? खारीची ही इच्छा पण पूर्ण करेल का बिस्कीट? हे आणि असे बरेच प्रश्न अलगदच सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर मनात निर्माण होतात, नाही का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत कारण खारी आणि बिस्कीटची ही गोंडस गोष्ट म्हणजेज खारी बिस्कीट हा सिनेमा येत्या १ नोव्हेंबर रोजी आपल्या भेटीला येणार आहे.
या सिनेमातून संजय यांची हाफ सेंच्युरी म्हणजेज ५० सिनेमांचा आकडा पूर्ण होत आहे. सिनेमात बिस्कीटची भूमिका आदर्श कदमने केलीय तर खारी साकारलीय वेदश्री खाडिलकर हिने याशिवाय सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते या बच्चेकंपनी सोबत नंदिता पाटकर, सुयश झुंझुरके आणि संजय नार्वेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.