Makeup Teaser: आगामी मेकअप सिनेमात रिंकू राजगुरुच्या अपोझिट झळकणार ‘हा’ अभिनेता, पाहा सिनेमाचा धमाल टीझर

मराठी पिक्चर बारी
Updated Dec 10, 2019 | 19:47 IST | चित्राली चोगले

Makeup Teaser: सैराट फेम रिंकू राजगुरु लवकरच मेकअप या आगामी मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा पहिला टीझर खूप गाजल्यानंतर आता सिनेमाचा दुसरा टीझर भेटीला आला आहे. पाहा या धमाल टीझरची झलक.

second teaser of upcoming marathi movie makeup released rinku rajguru to romance chinmay udgirkar onscreen
Makeup Teaser: आगामी मेकअप सिनेमात रिंकू राजगुरुच्या अपोझिट झळकणार ‘हा’ अभिनेता, पाहा सिनेमाचा धमाल टीझर  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • आगामी मराठी सिनेमा 'मेकअप'चा दुसरा टीझर भेटीला
  • रिंकू राजगुरूच्या अपोझिट झळकणार अभिनेता चिन्मय उदगिरकर
  • 'मेकअप' सिनेमा येत्या ७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र होणार रिलीज

मुंबई: सैराट या सुपरहिट सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु प्रचंड लोकप्रिय ठरली. सैराटने तिला इतकी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली की तिचा पुढचा सिनेमा कोणता याची प्रेक्षक चातकासारखी वाट पाहत होते. अखेर या वर्षांच्या सुरुवातीला रिंकूचा कागर सिनेमा भेटीला आला आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांनी रिंकूच्या कामाला पसंती दर्शवली. त्यानंतर रिकूं नव्याने सज्ज झाली आहे तिच्या आगामी मेकअप या सिनेमासाठी. मध्यंतरी सिनेमाचं पोस्टर आणि त्यानंतर सिनेमाचा पहिला टीझर भेटीला आला आणि सगळ्यांचा नजरा पुन्हा रिंकूकडे वळल्या. पहिल्या टीझरची खूपच चर्चा रंगली. ती चर्चा थंड होते ना होते सिनेमाचा दुसरा टीझर रिलीज झाला आहे.

हा नवीन टीझर सुरु होतोच तो एका धमाल नोटवर आणि रिंकूची यात दोन भिन्न रूपे पाहायला मिळतात. या सिनेमातील रिंकूचा बिनधास्त अंदाज नक्कीच अधोरेखीत होतो पण तिची दुसरी बाजू म्हणजेच तिने केलेला हा 'मेकअप' नेमका कशासाठी आहे ते मात्र एक कोडं आहे. हे कोडं उलगडण्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे असं दिसत आहे. या टीझरमधून अजून एक कोडं मात्र नक्कीच उलगडलं गेलं आहे आणि ते आहे सिनेमातील नायकाचं. या टीझरच्या अगदी शेवटी झलक मिळते ती अभिनेता चिन्मय उदगीरकरची. त्यामुळे या सिनेमात रिकूंच्या अपोझिट कोण झळकणार ते आता स्पष्ट झालं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रिंकू आणि चिन्मयची एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल हे निश्चित.

सिनेमाची अजून एक खास गोष्ट म्हणजे सिनेमाचा दिग्दर्शक. आपल्या अनोख्या लेखनाने, अभिनयकौशल्याने गणेश पंडितने मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशानंतर आता गणेश पंडित एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेन्मेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. निर्मित आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत मेकअप या सिनेमातून गणेश पंडितने आपलं पाऊल दिग्दर्शनाकडे वळवलं आहे. त्यामुळे गणेश पंडितचा एक वेगळा टच सिनेमाला मिळणार आहे.

दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग निर्मित आणि केतन मारू, कलीम खान सहनिर्मित या सिनेमाच्या सोशल मीडियावर नुकत्याच रिलीज झालेल्या नवीन टीझरला देखील उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सिनेमाचे दोन्ही टीझर पाहता मेकअप या सिनेमात काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार असा अंदाज वर्तवणं सहज शक्य आहे. ७ फेब्रुवारी २०२० रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी