Vicky Velingkar Teaser: ‘हिरकणी’नंतर सोनाली कुलकर्णी बनणार ‘विक्की वेलिंगकर’, पाहा रहस्यमय टीझर

मराठी पिक्चर बारी
Updated Nov 07, 2019 | 08:56 IST | चित्राली चोगले

सोनाली कुलकर्णीची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘विक्की वेलिंगकर’ सिनेमा जाहीर झाला आणि आता सिनेमाचा टीझर नुकताच भेटीला आलाय. यानंतर ‘मास्क मॅन’च्या भीतीदायक कारनाम्यांची प्रेक्षकांमध्ये उत्कंठा नक्कीच निर्माण होणारे

sonalee kulkarni starrer upcoming marathi film vicky velingkar’s intriguing teaser released
Vicky Velingkar Teaser: ‘हिरकणी’नंतर सोनाली कुलकर्णी बनणार ‘विक्की वेलिंगकर’, पाहा रहस्यमय टीझर 

थोडं पण कामाचं

  • 'विकी वेलिंगकर' सिनेमाचा रहस्यमय टीझर भेटीला
  • सोनाली कुलकर्णीची मध्यंवर्ती भूमिका
  • सिनेमा येत्या ६ डिसेबंर रोजी सर्वत्र होणार प्रदर्शित

मुंबई: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या हिरकणी म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. सोनालीचा हिरकणी हा सिनेमा नुकताच भेटीला आला असून सिनेमातल्या तिच्या कामाचं प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. फक्त एक ग्लॅमरस अभिनेत्री अशी असलेली तिची ओळख या सिनेमामुळे निश्चितच पुसली गेली आहे. हिरकणी म्हणून सर्वत्र लोकप्रिय ठरत असतानाच तिच्या आगामी सिनेमाची झलक मिळाली आहे. सोनाली आता लवकरच अजून एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मध्यंतरी सोनालीचा आगामी सिनेमा 'विक्की वेलिंगकर' जाहीर झाला आणि त्यानंतर सिनेमाचं पोस्टर भेटीला आलं. सोनाली हिरकणी म्हणून सगळीकडे गाजत असतानाच आता तिच्या विक्की वेलिंगकर सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे.

या टीझरची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता या सिनेमाबद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे. सौरभ वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या विक्की वेलिंगकर सिनेमामध्ये सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी यांच्या भूमिका आहेत. विक्की वेलिंगकर सिनेमाच्या या रहस्यमय टीझरमधून ‘मास्क मॅन’चा अधिक रुद्र आणि घाबरवणारा ‘चेहरा’ समोर येतो.

 

 

 

 

टीझरमधून सिनेमाची नायिका सोनाली कुलकर्णीच्या गर्भगळीत अवस्थेमुळे प्रेक्षकांमध्येही एक भीती निर्माण होते. “ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?,” हे पडद्यावर उमटणारे शब्द काहीतरी अघटीत तर घडणार नाही ना, अशी धास्ती निर्माण करून जातात. ‘लाईफ इज फुल ऑफ सरप्रायझेस’, असे वाक्य सोनालीच्या तोंडी आहे. या टीझर प्रमाणेच या सिनेमामध्येही अनेक सरप्रायजेस दडलेली असतील असा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच येतो. या टीझरची सध्या जोरदार चर्चा सोशल मिडियावर सुरु झाली आहे आणि टीझरला सध्या उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

 

 

 

 

‘मिकी व्हायरस’ आणि ‘7 अवर्स टू गो’ सिनेमा फेम असलेले सिनेमाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी सिनेमाबद्दल अधिक माहिती देताना सांगीतलं की, “विक्की वेलिंगकर ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून ती एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहणाऱ्या नायिकेची ही कथा आहे.” विक्की वेलिंगकर या सिनेमाची निर्मिती ‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार तसेच प्रणय चोकसी, डान्सिंग शिवा प्रॉडक्शनचे अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे. सोनाली कुलकर्णी व स्पृहा जोशी यांच्या वेगळ्या लूकचा आणि ‘मास्क मॅन’च्या रहस्याने भरलेला विक्की वेलिंगकर हा सिनेमा येत्या ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी